देवरुख : आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर देवरुख शहराला सोमवार आणि गुरुवारी पाणीकपात करण्याबाबत तसेच बांधकामांना पाणीपुरवठा सुरू ठेवायचा की बंद करायचा, यावर येथील नगरपंचायतीच्या शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. मात्र सद्यस्थितीत पाणीसाठा मुबलक असल्याने पाणीसाठा कमी झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा आणि आगामी काळातील नियोजनावर सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सभेला मुख्याधिकारी प्रशांत भोसले, उपनगराध्यक्ष वैभव पवार, तसेच नगरसेवक बाळा कामेरकर, निदा कापडी, कविता नार्वेकर, सागर संसारे, रूपेश भागवत, दीपक खेडेकर यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
महिला शेतकरी प्रमाणपत्रांना मंजुरी महिला सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत पात्र ३८० महिला शेतकऱ्यांना 'महिला शेतकरी प्रमाणपत्र' वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यादीस सभेने मंजुरी दिली. शहरातील प्रलंबित विकासकामांना मुदतवाढ देण्याबाबत या सभेत सविस्तर विचारविनिमय झाला असून ही मुदतवाढ अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न यावेळी प्रकर्षाने मांडण्यात आला. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांच्या निवाऱ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्याकरिता चर्मालय स्मशानभूमीजवळ जागा निश्चित करण्यात आली.
या सभेच्या विषयपत्रिकेत एकूण १३ महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता, त्यावर प्रशासकीय व लोकप्रतिनिधींच्या स्तरावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि पुढील कार्यवाही करण्याबाबत महत्त्वपूर्ण दिशा ठरवण्यात आली.