एकाच टँकरवर भागतेय ११ गावांची तहान 
रत्नागिरी

Ratnagiri Water Scarcity : एकाच टँकरवर भागतेय ११ गावांची तहान

खेड तालुक्यात दीड महिन्यात ९२ फेऱ्या : ४ लाख ६० हजार लिटर पाणीपुरवठा; २१ वाड्या टंचाईग्रस्त

पुढारी वृत्तसेवा

खेड : तालुक्यातील ११ गावांमधील २१ वाड्यांतील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला अजूनही एकाच शासकीय टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सुकिवली येथील चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, गेल्या दीड महिन्यात तब्बल ४ लाख ६० हजार लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या कालावधीत टँकरच्या ९२ फेऱ्या झाल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.

तालुक्यात उन्हाचा तीव्र तडाखा कायम असला तरी ८ मेनंतर नवीन गाव किंवा वाड्यांकडून टँकरसाठी कोणताही अर्ज प्रशासनाकडे दाखल झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्या ज्या ११ गावांतील २१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्या सर्व भागांत टँकरच्या पाण्यावरच ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे.

विशेष म्हणजे या वाड्यांमध्ये धनगरवाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी उपलब्ध होणारे पाणी अत्यल्प असल्याने ग्रामस्थांना काटकसरीने दिवस काढावे लागत आहेत. तालुक्यात ९ एप्रिलपासून घेरारसाळगड-भराडे धनगरवाडी तसेच निमणी-धनगरवाडी येथे पहिला टँकर धावला होता. दरम्यान, खेड तालुक्यात वर्षानुवर्षे टंचाई आराखड्यात समाविष्ट असलेल्या तब्बल २६ वाड्या टँकरमुक्त करण्यात ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाला यश आले आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रभावीपणे राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनांमुळे या भागांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त वाढ्यांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जलजीवन मिशन योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून विविध गावांमध्ये नळपाणी योजना राबवून पाणीटंचाई दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परिणामी, यंदाच्या टंचाई आराखड्यातून २६ वाड्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

विशेषतः सुसेरी-देवसडे येथील कदमवाडी, यादववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, सावंतवाडी आणि मधलीवाडी या सहा वाड्यांतील वर्षानुवर्षांची पाण्याची समस्या निकाली काढण्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे.

याशिवाय दिवाणखवटी-सातपानेवाडी, फुरूस गावठण, बौद्धवाडी, कातळवाडी, रेवाळेवाडी, पाटीलवाडी, सुतारवाडी, नवानगर, कांगणेवाडी, कुंभेवाडी तसेच फट-तळे येथील पालांडेवाडी परिसरातही मुबलक प्रमाणात जलस्रोत उपलब्ध झाले आहेत. उर्वरित टंचाईग्रस्त वाड्यांनाही कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT