लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात कंटेनरने धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या ओरा कारला भरधाव स्कॉर्पिओने मागून धडक दिली. या धडकेनंतर ओरा कारने अचानक पेट घेतल्याने आगीचे लोळ आणि धुराचे लोट महामार्गावर पसरले. शनिवारी पहाटे ४.३० वाजता झालेल्या पहिल्या अपघातानंतर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुसऱ्या धडकेत ओरा कार जळून खाक झाली. सुदैवाने या तिहेरी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विक्रोळी येथून कणकवलीच्या दिशेने ओरा कार (एमएच ४८ डी क्यू ३५५७) निघाली होती. सिकंदरकुमार किशोर साव (वय २३, रा. विरार, जि. पालघर) हे कार चालवत होते. अंशिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवाशांना घेऊन ही कार कणकवलीच्या दिशेने जात होती. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास वाकेड घाटात कार आली असता कंटेनरने तिला धडक दिली. त्यामुळे ओरा कार महामार्गाच्या संरक्षक कठड्यावर आदळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील प्रवासी बचावले. अपघातात कारच्या पुढील भागाचे नुकसान झाल्यानंतर ती महामार्गाच्या बाजूला उभी करण्यात आली होती. चालक व प्रवासी क्रेनची प्रतीक्षा करीत होते.
दरम्यान, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओचे (एमएच ४७ बीटी ८००६) नियंत्रण सुटले आणि तिने उभ्या ओरा कारला मागून जोरदार धडक दिली. नीरज मायशंकर यादव (२५, रा. उजैनपूर, उत्तर प्रदेश) हा स्कॉर्पिओ चालवत होता. धडकेनंतर ओरा कारने तत्काळ पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने महामार्गावर धुराचे लोट पसरले.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारळकर, पोलिस अंमलदार नासिर नावळेकर, स्वप्निल कदम, विलास जाधव आणि सचिन बळीप यांनी मदतकार्य केले. राजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून ओरा कारची आग आटोक्यात आणली. वाहनातील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ओरा कार पूर्णपणे जळून खाक झाली. लांजा पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.