चिपळूण : जागा-जमिनीवरून बोंदले व खान या कुटुंबात झालेल्या वादातून हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी परस्परविरेाधी तक्रार दाखल झाली असून नऊजणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच हाणामारीत दोन महिला जखमी झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता घडली. या बाबत मैमुना इस्माईल बोंदले (52) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अरबिना खान, मन्सूर अल्ली खान, माहीर आजीम खान, जमीर खान, राहील अजीम खान, शरिफा अली खान, शबाना मन्सूर खान (सर्व रा. वेहेळे खान मोहल्ला) या सातजणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बोंदले व खान कुटुंबात जमिनीवरून अनेक दिवस वाद होता, परंतु या बाबत कोणतीही फिर्याद नव्हती. 28 रोजी आरोपी अरबिना खान हिने बोंदले यांच्या अंगणात कचरा टाकला. त्याबाबत बोंदले यांनी विचारले असता सातजणांनी मिळून बोंदले यांना मारहाण केली व त्यात मैमुना बोंदले जखमी झाल्या.
याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. शबाना मन्सूर खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मैमुना बोंदले, इस्माईल बोंदले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबात जागेवरून वाद होते. बांधाजवळ बोंदले हे खड्डा खोदत असताना फिर्यादी शबाना खान हिने जाब विचारला. यावेळी मैमुना बोंदले यांनी शिव्या दिल्या. याचवेळी इस्माईल बोंदले त्यानी कोयती डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद दिली आहे.