चिपळूण : अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी, लांजा, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा सर्वाधिक परिणाम जाणवला. महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे सुमारे १०८ पोल तर लघुदाब वाहिनीचे सुमारे २३५ पोल कोसळले. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता.
वळवाच्या पावसामुळे जिल्हाभरातील वीज यंत्रणेला मोठे नुकसान सहन करावे लागले. वादळी वाऱ्यामुळे साडेतीनशेहून अधिक वीज पोल जमीनदोस्त झाल्याने अनेक गावांतील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दुरुस्ती कामाला लागले.