रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर भागात 1 ते 27 मार्च दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटात गारपीठीचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तब्बल 58 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. 34 गावे बाधित झाली असून 167 शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. यामध्ये 29.90 हेक्टरवरील आंबा तर 28.1 हेक्टरवरील काजू पिकांना तडाखा बसला आहे. ज्या ज्याठिकाणी नुकसान झाले आहे त्याठिकाणी कृषी विभागाच्यावतीने पाहणी करून 13 लाखांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवाल आला आहे.
गत वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने मुक्काम वाढवल्यामुळे हाती आलेल्या खरीप पिकांना मोठा फटका बसला. त्यानंतर रब्बी पिकांच्या पेरणीला ही उशिर झाला. आता बदलत्या हवामानाचा फटका आंबा, काजू पिकांना बसल्यामुळे यंदा 20 टक्केच आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडे 1 मार्च ते 27 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. तब्बल 58 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, काजू पिकांना फटका बसला आहे. खेड तालुक्यातील आंबा 5.65, चिपळूण मध्ये 2.02 हेक्टर, संगमेश्वरमध्ये 0.60, लांजा तालुक्यात 8.73, काजू 12.11 हे, राजापूर 13.50 तर काजू 15.20 हेक्टरवरील आंबा काजूचे नुकसान झाले आहे.
काहीअंशी भाजीपाला तसेच इतर पिकांना फटका बसला आहे. कृषी विभागाच्यावतीने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. आणखी काही दिवस गारपीठाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 31 मार्च ला वादळी पावसाचा इशारा देण्ात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.