रत्नागिरी : विशेष कार्यकारी अधिकारी हे मानाचे पद आहे, म्हणून कुणी स्वतःला मोठे शासकीय अधिकारी समजण्याची चूक करू नये. हे पद पक्षाच्या योगदानामुळे मिळाले असून जनतेची कामे न करणाऱ्या किंवा बैठकांना दांडी मारणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार काढायला मला एक मिनिटही लागणार नाही, अशा कडक शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
पाच वर्षांच्या या कार्यकाळात दरवर्षी नेमके काय काम केले, याचा अहवाल देण्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले. निवडणुकांमध्ये रक्त आटवून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दाखले काढणे किंवा कागदपत्रांच्या 'ट्रू कॉपी' मिळवणे यासाठी येणारा त्रास वाचावा, या उद्देशाने हे पद देण्यात आले आहे. मात्र, काही नगरसेवकांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. निवडून आणणाऱ्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला.
यापुढे केवळ नावापुरते अधिकारी न राहता प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने आपण केलेल्या कामांची नोंद ठेवणे बंधनकारक असेल. दरवर्षी घराघरांमध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवणे, शासकीय योजना पोहोचवणे आणि त्याचा वार्षिक अहवाल सादर करणे आवश्यक आहे. केवळ पदाचा गैरवापर करून पक्ष किंवा पदाची बदनामी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. येत्या काळात जुन्या प्रलंबित याद्या पूर्ण करून नवीन कार्यकर्त्यांनाही न्याय दिला जाईल, असे स्पष्ट करत पालकमंत्र्यांनी या पदाचा उपयोग पक्षवाढीसाठी आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे, असा स्पष्ट इशारा दिला आहे. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाबाबत प्रांताधिकारी जीवन देसाई व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.