गुहागर : गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनार्यावर दोन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. फिशिंग रॉडच्या साहाय्याने मासेमारी करत असताना हे दोन्ही तरुण समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सलिम पटेल व जावेद सुर्वे अशी त्यांची नावे आहेत.
दोघे तरुण चिपळूण गोवळकोटमधील असल्याचे तपासात पुढे आले आहे. यानंतर गोवळकोट मोहल्ल्यामध्ये शोककळा पसरली आहे. हे तरुण बुधल बीचच्या खडकाळ भागात फिशिंग रॉड घेऊन मासेमारीसाठी आले होते. मात्र, याचदरम्यान समुद्राच्या लाटांचा किंवा पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने ते समुद्रात वाहून गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती बुधल गावातील स्थानिक ग्रामस्थांना मिळताच, त्यांनी अत्यंत सतर्कता दाखवत तत्काळ गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांच्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच सभापती प्रणव पोळेकर यांनी कोणतीही वेळ न घालवता अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळ गाठले. त्यांनी तातडीने पोलिस आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पंचनामा आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मासेमारीचा छंद या दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याने चिपळूण आणि गुहागर परिसरात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.