रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे-उक्षी मार्गावरील शिळ पवार स्टॉप येथे गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ११ विद्यार्थी आणि एका एसटी चालकासह एकूण १२ जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही एसटींचे मोठे नुकसान झाले आहे.
चालक वलिखान गुलाबखान पठाण (रा. माळनाका, रत्नागिरी) हे एमएच-१४ बीटी-२२३१ क्रमांकाची एसटी बस भावेआडम येथून रत्नागिरीकडे विद्यार्थ्यांना घेऊन येत होते. त्याचवेळी प्रफुल्ल नागवेकर हे एमएच-१४ बीटी-४४५९ क्रमांकाची एसटी बस रत्नागिरीहून दांडेआडमकडे घेऊन जात होते. शिळ पवार स्टॉपजवळ दोन्ही बस समोरासमोर आल्या असता विद्यार्थ्यांची बस चालविणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. बस विरुद्ध दिशेला गेल्याने समोरून येणाऱ्या एसटीवर ती जोरात आदळली दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अपघातात जखमींची नावे
या अपघातात चालक वलिखान पठाण यांच्यासह तन्वी रेवाळे, स्नेहल खापणे, सुजल सनगरे, प्रतीक तांबे, सिद्धेश खापणे, तेजस्विनी खापणे, आदिती तांबे, कल्याणी रेवाळे, श्रुती तांबे, सदिच्छा सनगरे, आर्या जाधव हे विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने बचावकार्य केले.