चिपळूण : हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक संकेश घाग याला अखेर अनेक महिन्यांनंतर चिपळूण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या अटकेनंतर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांनी चिपळूण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर गर्दी केली. पुणे येथून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. येथील न्यायालयाने त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
टीडब्ल्यूजेचा संचालक संकेश घाग याच्या अटकेचे वृत्त शहरात पसरताच या कंपनीमध्ये पैसे गुंतविणाऱ्या लोकांनी न्यायालयासमोर मोठी गर्दी केली होती. गेले अनेक दिवस तो बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते. पोलिसांनी त्याला अटक करून मंगवारी (दि. 27) सकाळी न्यायालयासमोर हजर केले. टीडब्ल्यूजे कंपनीकडून आकर्षक परताव्याचे आमीष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेण्यात आली. लाखाला 7 टक्क्यांपासून ते 4 टक्क्यांपर्यंत प्रतिमहिना व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांना प्रतिमहिना व्याजदेखील मिळाले. त्यामुळे लोकांचा विश्वास बळावला. यानंतर शासकीय कर्मचारी, निवृत्त शासकीय कर्मचारी, पोलिस, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार अशा सर्वांनीच या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविले. लोटे औद्योगिक वसाहतीमधील अनेक लोकांनी देखील या कंपनीमध्ये जास्त परताव्याच्या आमिषाला भुलून गुंतवणूक केली. मात्र, गेल्या वर्षभरापासून परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
या कंपनीचा संचालक समीर नार्वेकर व अन्य साथीदारांविरोधात पुणे, यवतमाळ, चिपळूण, गुहागर व अन्य ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर कारवाईचा फास आवळला जात आहे. यामध्ये संकेश घाग याचाही समावेश आहे. घाग याच्या नावावर असलेली मालमत्तादेखील सील करण्यात आलेली आहे. हजार कोटीहून अधिक रुपयांची ही फसवणूक असल्याने यामध्ये हजारो लोकांची फसवणूक झालेली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळुणातील काही गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर संकेश घाग याला अटक झाली आहे. संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याने गुंतवणूकदारांनी मोर्चा, आंदोलने व निवेदने देत कारवाईची मागणी केली होती. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले असून चिपळूण पोलिसांनी संकेश घाग याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.