खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटातून मंगळवार दि.31 रोजी पहाटे मुंबईच्या दिशेने जाणार्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण मोठ्या वळणावर सुटल्याने ट्रक थेट रस्त्याशेजारी असणार्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकला. या अपघातात संरक्षक भिंत ढासळली असून ट्रकचालक गंभीर जखमी झाला. ट्रक भिंतीवर धडकून थांबला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर सुरुवातीपासूनच अपघात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नसून हे वळण आहे. तसे ठेवून वाहन चालकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाने केल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी घडणार्या अपघातांवर उपाय म्हणून महामार्ग विभागाने गतिरोधकांची उभारणी केली होती. सद्यस्थितीला हे गतिरोधक काही ठिकाणी सुस्थितीत तर काही ठिकाणी खराब झालेले पहावयास मिळत आहेत. तर या गतिरोधकांमुळे अवजड वाहनांची एअर प्रेशर कमी होऊन गाड्यांना ब्रेक लागत नसल्याची माहिती वाहन चालकांकडून देण्यात येत आहे. यामुळेच या वळणावर आल्यावर गाड्या अनियंत्रित होऊन अपघात घडण्याच्या घटना वारंवार घडताना पाहावयास मिळत आहे. घाटातील अवघड वळणावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठोस उपाययोजना करून हे वळण हटवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी वाहन चालकातून होत आहे.