खेड : तालुक्यातील पंधरागाव विभागातील धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर उशिरा स्थानिकांच्या मदतीने तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने पंधरागाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. १८ मे रेाजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. लावण्या विजय पार्टे (१५, रा. साखर चौकीचीवाडी, ता. खेड), नितीन सूर्यकांत जाधव (३८, रा. गिमवी, ता. गुहागर) आणि विराज किशोर जाधव (१२, रा. गिमवी, ता. गुहागर) हे तिघे धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.याप्रकरणी अरुण गोपाळ पार्टे यांनी खेड पोलिसांत खबर दिली असून, खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त पार्टे यांचे कळवा येथे राहाणारे जावई नितीन जाधव आपल्या पुतण्यासह धामणंद येथे आले होते. पुतण्या विराज जाधव व लावण्या विजय पार्टे यांना बरोबर घेऊन ते नदीमध्ये डोहात पोहण्यासाठी सोमवारी दुपारी गेले. वाढत्या उकाड्याने हैराण झाल्याने नदीमध्ये आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही या डोहात बुडाले. घटनेचे वृत्त कळताच परिसरातील लोकांनी या डोहाकडे धाव घेतली व शोधकार्य सुरू केले. सुरुवातीला मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यानंतर उशिरा सायंकाळी परिसरातील कातकरी समाजातील तरुणांनी डोहात उड्या घेत दोघांचेही मृतदेह शोधून काढले. सायंकाळी उशिराने तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातवाईकांकडे सोपविण्यात आले. या घटनेमुळे धामणंद, साखर परिसरात शोककळा पसरली असून, गिमवी (ता. गुहागर) मध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
काका-पुतण्याचा बुडून मृत्यू...
पार्टे कुटुंबीयांचे जावई असलेले नितीन जाधव हे आपल्या पुतण्याला घेऊन सासरवाडीला आले होते. रविवारीदेखील त्यांनी डोहात पोहण्याचा बेत केला होता आणि ते रविवारी या डोहात पोहलेदेखील होते. त्याचप्रमाणे सोमवारी दुपारी चायनीज खाल्ल्यानंतर वाढत्या उकाड्याने हैराण झाल्याने त्यांनी त्याच डोहात पोहायला जाण्याचा बेत केला. यावेळी एकाला वाचविताना तिघेही या डोहातील पाण्यात बुडाल्याची चर्चा परिसरात सुरू होती. पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांचा या डोहात बुडून मृत्यू झाला. याआधी चार दिवसांपूर्वी याच डोहात कपडे धुण्यासाठी आईबरोबर आलेल्या एका चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच तिघांचा बुडून मृत्यू झाला आणि अनर्थ घडला.