चिपळूण : कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणेकर चाकरमानी गावागावांत दाखल होत आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी भरून गेला आहे. महामार्गावर वाहनांची रिघ लागली असून पाच ते आठ तासांपर्यंत प्रवाशांचा खोळंबा होत आहे. ठीक ठिकाणी चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. गणेशभक्त आपल्या गावी दाखल होत आहेत. विशेष करून चिपळूणमधील उड्डाणपुलाचा भराव रखडल्याने यावर्षी पुन्हा एकदा गणेश भक्तांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. चिपळूण बहादूर शेख चौक येथे मुंबई-गोवा महामार्ग आणि चिपळूण- कराड रोड एकत्र मिळतात. त्यामुळे या चौकात दरवर्षी गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होत असते. याहीवर्षी या वाहतूक कोंडीला चाकरमान्यांना सामोरे जावे लागले.
शुक्रवारी रात्रीपासून या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. शनिवारी दिवसभर महामार्गावर वाहनांची रीग लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळत होता. तरीही पोलिस प्रशासनाने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला होता. आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी यंत्रणा सज्ज होती.
येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. याशिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच प्रांताधिकारी हे सातत्याने या ठिकाणी पाहणी करत होते. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू होता. पेढे फरशी तिठा येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्या ठिकाणी ही पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. तर हलकी वाहने पेढे मार्गे गुहागर बायपास मार्गे वळवण्यात आली. मोठी वाहने महामार्गावरून सोडण्यात आली. यामुळे कोंडी फोडण्यात थोडे यश मिळाले. दिवसभर महामार्ग गर्दीने फुलून गेला होता .
चाकरमानी मिळेल त्या गाडीने आपल्या गावाकडे दाखल होताना दिसत होते. मोटार सायकल, रिक्षा, कार, जीप, खासगी आराम बस, एसटी, टेम्पो ट्रॅव्हलर, ट्रॅक्स या वाहनातून चाकरमानी गावात दाखल होत आहेत. मात्र प्रवासाला लागणाऱ्या अतिरिक्त वेळामुळे ते नाराजी व्यक्त करत होते. १७ वर्षे रखडलेल्या महामार्ग कधी एकदा पूर्ण होतो व मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कधी संपुष्टात येते यासाठी हे चाकरमानी बाप्पाकडे प्रार्थना करत होते.