दापोली : तालुक्‍यातील हर्णे येथील समुद्रकिनार्‍यावर उसळलेली पर्यटकांची गर्दी.  
रत्नागिरी

Ratnagiri Tourism| जिल्‍ह्यातील पर्यटनस्‍थळे पर्यटकांनी हाऊसफुल्‍ल

दिवाळीनिमित्त रत्‍नागिरी, गणपतीपुळे, दापोली, गुहागरमध्ये पर्यटकांचा महापूर

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : दिवाळीनिमित्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली येथून लाखोंच्‍या संख्येने पर्यटक दिवाळीच्‍या सुट्ट्या घालवण्यासाठी अन्‌ दिवाळी साजरी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लॉज, हॉटेल, होम-स्टे, रिसॉर्ट जवळपास हाऊसफुल्ल झाले आहेत. भाट्ये, मांडवी, आरेवारे, गणपतीपुळे, दापोली, गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्‍या आहेत. त्‍यामुळे पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या प्रमणात बाहेर पडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यातील पर्यटक सर्वात जास्‍त पसंती कोकणाला देत असतो. त्‍यामुळे रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्‍ह्यात पर्यटकांचा महापूर पाहावयास मिळत आहे. रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस, मांडवी बीच, भाट्ये बीच, शिवसृष्टी, भगवती किल्ला यासह विविध ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. दिवाळीच्या सुट्टीत कोकणात आलेले पर्यटक येथील स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्ग, मंदिरे आणि कोकणी जेवणाचा मनमुराद आनंद घेत आहेत.

आरे-वारे, रत्‍नागिरी, गणपतीपुळे, दापोली, गुहागरला पसंती

गणपतीपुळे, दापोली, गुहागर, आरे-वारे, रत्नागिरी शहराला पसंती दिली आहे. गणपतीपुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब रांग लागली आहे. समुद्रकिनाऱ्यावर सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी दिसत आहे. दापोलीतील लाडघर, कर्दे, मुरुड, केळशी बीचवरही पर्यटकांनी गर्दी केली आहे. गुहागरच्या वेळणेश्वर, हेदवी, बामणघळ येथेही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. आरे-वारे बीचवर तरुणाईचा मोठा वावर आहे. सेल्फी, फोटो, बोटिंग, वॉटर स्पोर्टस्‌साठी पर्यटकांची गर्दी होत आहे. याचबरोबर लांजा येथील खोरनिनको धरण, येथील प्राचीन मंदिरे, राजापुरातील मंदिरे, समुद्रकिनारा यासह विविध ठिकाणी पर्यटकांची दिसून येत आहे.

मुख्य रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर तसेच गणपतीपुळे, दापोली, गुहागर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी शहरातील माळनाका, मारुती मंदिर, एसटी स्टँड परिसरात वाहनांची कोंडी होत आहे. पार्किंगसाठी पर्यटकांना वणवण भटकावे लागत आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT