वैभव पवार
गणपतीपुळे : कोकणातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात पर्यटकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान लाखो भाविक व पर्यटकांनी गणपतीपुळेला भेट दिल्याची माहिती गणपतीपुळे देवस्थान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही भाविक आणि पर्यटकांची गर्दी कायम असून, यंदाचा पर्यटन हंगाम स्थानिक व्यावसायिकांसाठी मोठा दिलासादायक ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गणपतीपुळे हे पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यंदाच्या पर्यटन हंगामात महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा तसेच उत्तर भारतातील विविध राज्यांतून हजारो पर्यटकांनी गणपतीपुळेला भेट दिली. अनेक विदेशी पर्यटकांनी देखील येथे येत समुद्रकिनाऱ्याचा आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. स्वयंभू श्री गणपतींचे दर्शन, अथांग समुद्रकिनारा, स्वच्छ वातावरण, नारळी-पोफळीच्या बागा आणि शांत निसर्ग यामुळे गणपतीपुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. विशेषतः शनिवार आणि रविवारी गणपतीपुळे येथे दररोज ३५ ते ४० हजारांपर्यंत भाविक व पर्यटकांची उपस्थिती नोंदवली गेली. त्यामुळे वाहतूक, पार्किंग, हॉटेल्स आणि भोजनालयांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आणि जूनच्या सुरुवातीपर्यंत पर्यटक संख्येत विक्रमी वाढ झाल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी गणपतीपुळे देवस्थान समितीकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि प्रसाद वितरण यावर विशेष लक्ष देण्यात आले. त्यामुळे तुडुंब गर्दी असूनही दर्शन व्यवस्था सुरळीत राहिली आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले.
भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर परिसरातील प्रसाद केंद्र, भोजनालये आणि स्थानिक विक्रेत्यांनाही मोठा फायदा झाला आहे. धार्मिक पर्यटनासोबतच समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पर्यटनस्थळांना पर्यटकांनी मोठी पसंती दिली.
यंदाच्या पर्यटन हंगामामुळे गणपतीपुळेतील हॉटेल व्यवसाय, रिसॉर्टस्, होमस्टे, खानावळी, पर्यटन सेवा, वाहन व्यवसाय, दुकाने आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. गेल्या काही वर्षांतील मंदावलेला पर्यटन व्यवसाय यंदा पुन्हा तेजीत आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अनेक हॉटेल्स आणि लॉजेसमध्ये आगाऊ बुकिंग पूर्ण भरले होते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या व्यावसायिकांनाही पर्यटकांच्या गर्दीमुळे चांगली उलाढाल झाली. स्थानिक रोजगारालाही मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या शाळा-कॉलेजांच्या सुट्ट्या संपत असल्या तरी जून महिन्याच्या मध्यापर्यंत गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.
दररोज हजारो भाविक घेतात प्रसादाचा लाभ
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि संभाव्य इंधन टंचाई लक्षात घेऊन देवस्थान समितीने प्रसाद व्यवस्थेतही विशेष काळजी घेतली होती. दुपार व सायंकाळच्या प्रसादाच्या वेळा वाढवून भाविकांना सुविधा उपलब्ध केल्या होत्या. आता परिस्थिती पूर्ववत होत असल्याने प्रसादाच्या वेळा नियमित केल्या आहेत. तसेच मार्च महिन्यात बंद केलेला भाविकांचा आवडता लाडू प्रसाद पुन्हा सुरू केला आहे. गणपतीपुळे येथे दररोज हजारो भाविक देवदर्शनासोबत प्रसादाचाही लाभ घेत आहेत. दुपारच्या सत्रात सुमारे २ हजार भाविक खिचडी प्रसाद ग्रहण करतात, तर सायंकाळच्या सत्रात १२०० ते १३०० भाविक प्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाकडून देण्यात आली.