रत्नागिरी : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या तीन मल्लांनी सुवर्णपदके पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. सोहम खंडेराव पाटील, समर्थ संजय कुदळे आणि राजवीर सतीश पवार यांनी विविध वजन गटात अव्वल स्थान मिळवले.
रत्नागिरी तालुक्यातील आदर्श हायस्कूल, कुरतडे येथील सोहम पाटील याने फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५२ किलो गटात, तर समर्थ कुदळे याने ५७ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. या दोघांना क्रीडा शिक्षक मानसिंग कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
महात्मा गांधी विद्यालय, उंबरे येथील राजवीर पवार याने ३८ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. त्याला मारुती गलांडे यांचे मार्गदर्शन लाभले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सरावासाठी आधुनिक कुस्ती मॅट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मॅटवरील नियमित सरावाचा खेळाडूंना फायदा झाल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.