Job Scam Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Job Scam : फ्रँचायझीसह सरकारी नोकरीच्‍या आमिषाने तिघांना तब्‍बल १ कोटी १० लाखांचा गंडा

रत्‍नागिरीतील घटना; संशयिताविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : नामवंत कपड्याची फ्रँचायझी घेऊया, अशी बतावणी केली. त्याशिवाय सरकारी नोकरीसाठी इंटरव्‍ह्यूचे खोटे पत्र देत तब्बल १ कोटी १० लाख १ हजार ८३ रुपयांना गंडवले. फसवणुकीचा हा प्रकार १८ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत शहरातील गाडीतळ परिसरात घडला.

आकाश प्रकाश रसाळ (रा. परटवणे - सरोदेवाडी, रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात रॉबीन स्टिव्हन्स सोन्स (४९, रा. मयूरेश अपार्टमेंट, जयस्तंभ-रत्‍नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यानुसार संशयित आरोपी आकाश रसाळ याने फिर्यादीला आपण कपड्याच्या ब्रँडची फ्रँचायझी घेऊया, असे सांगून त्‍यांच्याकडून तब्बल १ कोटी १० लाख २२ हजार ५४ रुपये उकळले, परंतु त्‍यानंतर संशयिताने फिर्यादीला फ्रँचायझी दिली नाही. फिर्यादीने त्‍याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केल्यावर त्‍याने एकूण रकमेपैकी केवळ १२ लाख २० हजार ९७१ रुपये परत केले. उर्वरित ९८ लाख १ हजार ८३ रुपये परत केलेले नाहीत.

त्‍याचप्रमाणे संशयिताने फिर्यादीची मावस बहीण विधाता किशोर भोळे (रा. सोहम रेसिडन्सी, जोशी पाळंद, रत्‍नागिरी) हिला मंत्रालयात डेप्युटी कलेक्टर म्हणून खोटे नियुक्तीचे पत्र दिले. तसेच फिर्यादीची दुसरी मावस बहीण पद्मश्री सचिन पेटकर आणि तिचे पती सचिन सुनील पेटकर (रा. म्हाडा कॉलनी, बोरीवली-पूर्व मुंबई) यांना मंत्रालयातील बांधकाम विभागातील कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरीसाठी मुलाखत असल्याचे खोटे पत्र दिले. त्‍यासाठी संशयिताने एकूण १५ लाख रुपये घेतले, परंतु त्‍याने खोटे नियुक्तीपत्र दिल्याचे समजल्याने फिर्यादीने त्‍याच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्‍याने ३ लाख रुपये परत केले. अशा प्रकारे संशयित आकाश रसाळ याने फिर्यादीला कपड्याची फ्रँचायझी आणि त्‍याच्या दोन मावस बहिणींना सरकारी नोकरीचे आमिष दाखविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT