रत्नागिरी : विधानसभेतील पराभव जिव्हारी लागलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकार्यांनी रविवारी हातिस गावी जाऊन पीर बाबरशेख बाबांचे दर्शन घेतले आणि पक्षाचे चांगले संघटन रहावे आणि विरोधी काम करणार्यांना शिक्षा द्यावी, असे गार्हाणे घातले. यामुळे शिवसैनिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका कार्यकारिणीमधील पदाधिकारी विधानसभेतील पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवानंतर चांगलेच व्यथित झाले आहेत. माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पदाधिकार्यांमध्ये हमरीतुमरी झाली.
काही पदाधिकारी जिल्ह्यातील नेत्यावर धावूनही गेले. त्यावेळेपासून काही पदाधिकारी संतप्त होते. झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावेळी पदाधिकार्यांनी हातिस येथे जाऊन शपथ घेऊया असा प्रस्तावही ठेवला होता. मात्र माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यावेळी सावरुन घेतले होते.
रविवारी तालुका कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी तालुकाप्रमुख प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली हातिस येथे पीर बाबरशेख बाबांचे दर्शन घेतले. याठिकाणी पक्ष संघटन चांगले रहावे आणि आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली. त्याचप्रमाणे विधानसभेत पक्षविरोधी काम करणार्यांना शिक्षा मिळावी असे गार्हाणेही यावेळी घालण्यात आल्याचे काही पदाधिकार्यांनी सांगितले. तालुका कार्यकारिणीतील सर्वच पदाधिकार्यांना हातिस येथे येण्याचा ‘मेसेज’ पाठवण्यात आला होता. परंतु काही पदाधिकारी अनुपस्थित होते, ते का आले नाहीत यावर चर्चा करण्याचे पदाधिकार्यांनी टाळले. काहीजण कौटुंबिक कारणास्तव आले नसल्याचेही सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीर बाबरशेख बाबांना घालण्यात आलेल्या गार्हाण्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.