राजापूर : गणेशोत्सव सणासाठी मुंबई-कुर्ला येथून मालवण-कुणकवळे येथे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीवर आदळून झालेल्या अपघातात ट्रॅव्हलर्समधील चालकासह १६ प्रवासी जखमी झाले. ट्रॅव्हलर्समधील सर्व प्रवासी हे एकाच कुटुंबातील आहेत. यातील दहाजणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आल. तर उर्वरित सहा जण किरकोळ जखमी झाले. रविवारी सकाळी ९.२० च्या दरम्यान महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर हा अपघात घडला. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी चालक अक्षय यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-कुर्ला येथील देसाई कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलर्सने गणेशोत्सवासाठी मालवण कुणकवळे येथे जात होते. टेम्पो ट्रॅव्हलर्स (क्र. डीडी ०१ एजी ९५७३) हा चालक अक्षय सुनील यादव (३०, रा. रहिमतपूर) चालवत होता. मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेत हॉटेल शिवानंदजवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याबाहेर जाऊन मोरीवर आदळून हा अपघात झाला. यात चालक यादव यासह सर्व प्रवासी जखमी झाले. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये चालक अक्षय यादवसह सखाराम महादेव देसाई (६८) शशिकांत नारायण देसाई (४७), सुषमा सखाराम देसाई (६५), राकेश सखाराम देसाई (३८), रूचा राजेश देसाई (३५), आयाध्य राजेश देसाई (४), सतोष महादेव देसाई (५३), स्नेहल संतोष देसाई (४५), विनिती राकेश देसाई (३५, सर्व रा. कुर्ला मुंबई) यांचा समावेश आहे. यातील सहा जणांना फ्रॅक्चर असून, चार जणांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर किरकोळ जखमींमध्ये चिन्मय संतोष देसाई (१८), जान्हवी संतोष देसाई (२०), तिर्था राकेश देसाई (२), ऊर्मिला उल्हास देसाई (५२), भक्ती उल्हास देसाई (२६, सर्व रा. कुर्ला मुंबई) यांचा समावेश आहे. या सर्वांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यातील गंभीर जखमी रुग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत पाठविण्यात आले. त्यांच्यासोबतच हे किरकोळ जखमी असलेले सर्व रुग्णही रत्नागिरीत गेल्याचे डॉ. राम मेस्त्री यांनी सांगितले. याची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, सहा. पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील, सागर खंडागळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना रिक्षाचालक संतोष सातोसे, नाना कुवळेकर यांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानिक पोलिसपाटील धालवलकर यांसह ग्रामस्थांनीही जखमींना रुग्णालयात आणण्यास सहकार्य केले.