रत्नागिरी जिल्हा परिषद pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri : शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेला वेग; 249 जणांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या

आतापर्यंत 4 टप्पे पूर्ण; एकूण 7 टप्प्यात होणार बदल्या

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचा तब्बल दोन वर्षांपासूनचा वनवास आता संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध न्यायालयीन प्रकरणे आणि संचमान्यतेच्या अभूतपूर्व गोंधळामुळे रखडलेली ही प्रक्रिया अखेर सुरू झाली असून, तिला आता वेग आला आहे. यावर्षी सात टप्प्यांत होणार्‍या या बदली प्रक्रियेतील चार टप्पे पूर्ण झाले असून, यामध्ये 249 शिक्षकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळाली आहे. यामुळे दोन वर्षांपासून मनस्ताप सहन करणार्‍या हजारो शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील दोन वर्षे बदल्यांची प्रक्रिया राबवली न गेल्याने बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, या प्रक्रियेसमोर सुरुवातीपासूनच अडथळ्यांची शर्यत होती. आंतरजिल्हा बदली झालेल्या काही शिक्षकांनी त्यांची पूर्वीच्या जिल्ह्यातील मूळ सेवाज्येष्ठता बदलीसाठी ग्राह्य धरावी, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी बदली प्रक्रियेलाच स्थगिती दिल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच, शासनाने आणलेले नवे संचमान्यता धोरण या प्रक्रियेतील सर्वात मोठा ‘कळीचा मुद्दा’ ठरले. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड प्रमाणीकरणानुसार संचमान्यता निश्चित करण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात जवळपास 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरले. यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आणि बदली प्रक्रियेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

वास्तविक, ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार ही प्रक्रिया 31 मे पूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. अखेर सर्व अडथळ्यांवर मात करत ग्रामविकास विभागाने ‘व्हिनस’ कंपनीच्या पोर्टलद्वारे बदली प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. सध्या पाचवा टप्पा सुरू असून, विशेष संवर्ग एक आणि दोनमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियाही यात समाविष्ट आहे. प्रशासनाने ही संपूर्ण प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी उर्वरित टप्पे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT