चिपळूण : गुहागर तालुक्यातील मराठी शाळेत दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक उदय नामदेव वेल्हाळ याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. बी. म्हाळलकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी प्रभावी बाजू मांडली.
मार्च २०२० मध्ये गुहागर तालुक्यातील मराठी शाळेत दुसरीतील बालिकेला शिकवण्यासाठी आरोपी उदय वेल्हाळ याची नियुक्ती झाली होती. ७ मार्च २०२० रोजी पीडित बालिका घरी परतल्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपी शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे बालिकेने सांगितले. त्यानंतर आईने गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास केला. तपासाअंती दोषारोपपत्र चिपळूण न्यायालयात सादर करण्यात आले. खटल्याची सुनावणी सुरू असतानाच दुर्दैवाने पीडित बालिकेच्या आईचे निधन झाले. मात्र, सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये आणि गुहागर पोलिसांनी सरकारी पक्षाची बाजू ठामपणे मांडली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी उदय नामदेव वेल्हाळ याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांत कठोर शिक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.