रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या गटात रत्नागिरीच्या युवा जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची लयलूट केली.
यात रुद्र परेश सरफरे याने ५०, १०० व २०० मीटर बटरफ्लाय या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक, रुद्र नीलेश लाड याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक व ४,१०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघात सहभागी होत सुवर्णपदक, सान्वी साळवी हिने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्यपदक, जतीन भोसले याने ४१०० मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदक, तर १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक, आदित्य राणे याने ४,१०० मीटर रिले संघात सुवर्णपदक, अर्जुन नाचणकर ४,१०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघातून सुवर्णपदक, तर हर्ष रूपेश शेलार याने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक मिळवले. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.