वालोपे खूनप्रकरणी संशयित कोल्‍हापुरात जेरबंद 
रत्नागिरी

Ratnagiri Crime : वालोपे खूनप्रकरणी संशयित कोल्‍हापुरात जेरबंद

चिपळूण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील वालोपे परिसरात १६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात चिपळूण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे अवघ्या पाच दिवसांत सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पवन आंबेडे (वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) याला कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले. नवनाथ बबन कांबळे (वय ३३, मूळ वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

१६ नोव्हेंबर रोजी वालोपे परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, एका पानटपरीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तपासात मृत तरुण नवनाथ कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. तो चिपळूणमध्ये मामाकडे राहत होता.

पोलिसांकडून रेल्वेस्थानक परिसरापासून महामार्गापर्यंत सुमारे ५० ते ७० कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ३० ते ४० संशयितांचे कॉल डिटेल्स तपासले. यातून संशयिताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले.

चिपळूण पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजित थोरात आणि प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासात पवन आंबेडे याच्यावर संशय निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनामागील नेमके कारण, आर्थिक व्यवहारांचा संबंध आणि अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

या कारवाईत उपनिरीक्षक आगाव, राजेश यादव, विकास निकम यांच्यासह शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कामगिरीची दखल घेत तपास पथकाला ३० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT