चिपळूण : तालुक्यातील कळंबट गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिरकर हे मार्गताम्हाणे येथून रविवारी रात्री मोटारसायकलवरून घरी परतत असताना कळंबट बौद्धवाडीत अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. यावेळी मोटारसायकलवर मागे त्यांचा मुलगा बसला होता. बिबट्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो थोडक्यात बचावला. पण त्याच्या अंगावर बिबट्याची नखे लागल्याने जखमी झाला असून, त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र, वहाळ येथे दाखल करण्यात आले आहे.
अलीकडच्या पावसामुळे सर्वत्र दाट झाडी निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेलाही झुडपे वाढल्याने रात्री प्रवास करताना वन्यप्राण्यांचा धोका वाढला आहे. विशेषतः कळंबट परिसरात बिबटे वारंवार ग्रामस्थांना दिसत असून, त्यांनी यापूर्वी बकर्या, कुत्री व गुरांवर हल्ले करून शेतकर्यांचे नुकसान केले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असून, वन खात्याने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.