राज्य ग्रंथालय संयुक्त अधिवेशन आता 21पासून  File Photo
रत्नागिरी

State Library Convention : राज्य ग्रंथालय संयुक्त अधिवेशन आता 21पासून

जिल्हा परिषद निवडणूक 7 तारखेला जाहीर झाल्याने अधिवेशन पुढे ढकलले!

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरकमहोत्सवी कोकण विभाग ग्रंथालय संघ, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन 7 व 8 फेब्रुवारी रोजी घेण्याचे ठरले होते, परंतु राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी जाहीर केल्या असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन 7 फेब्रुवारीऐवजी 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शांतीनगर नाचणे येथील बालाजी मंगल कार्यालयात होणार आहेत.

या दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार भूषविणार असून अधिवेशनाचे उद्घाटन उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम, अधिवेशन स्वागताध्यक्ष म्हणूनउद्योजक दीपक गद्रे, साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथसखा वाचनालय विश्वस्त श्याम जोशी, कोकण विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, गुलाब पाटील, सोपान पवार, राम मेकले, भीमराव पाटील, नंदू बनसोड, सुनील कुबल उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या दिवशी सार्वजनिक ग्रंथालयांची आत्मनिर्भरता, संगणकीकरण, अनुदानाव्यतिरिक्त उत्पन्नाची साधने वाढविणे विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सर्वसाधारण सभा, कार्यकारी व नियामक मंडळाच्या सभा पार पडणार आहेत. दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतील शताब्दी ग्रंथालयांवर परिसंवाद, तसेच ग्रंथालय चळवळीचा मुळाधार असलेल्या ग्रंथालय सेवकांवर विशेष सत्र होणार असून शेवटी खुले अधिवेशन होणार आहे. या खुल्या अधिवेशनातून ग्रंथालय चळवळीच्या भविष्यासाठी नवे विचार, संकल्पना व दिशा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या अधिवेशनाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ व आमदार स्व. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, कार्याध्यक्ष रामदास गायकवाड, प्रमुख कार्यवाह प्रकाश पाटील, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, प्रमुख कार्यवाह महेंद्र दळवी, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, संचालक विश्वनाथ बापट, राज्य संचालक रवींद्र कालेकर, तसेच राकेश अंबेरकर, विजय कालेकर, गजानन जोशी, रोशनी सावंत परिश्रम घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT