रत्‍नागिरी विभागाने १०० नव्‍या एसटी बसेससाठी पाठवला प्रस्‍ताव 
रत्नागिरी

रत्‍नागिरी विभागाने १०० नव्‍या एसटी बसेससाठी पाठवला प्रस्‍ताव

लवकरच २४६ बसेस जाणार भंगारात; सध्या शिल्‍लक ६५० एसटी बसेसवर वाहतूक सुरू

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी विभागातील बसेसची दुरवस्‍था मोठ्या प्रमाणात झाली आहे. मागील काही महिन्‍यापूर्वी १५० हून अधिक बसेस भंगारात गेल्‍या होत्‍या. त्‍यानंतर आणखी २४६ बसेस भंगारात जाणार आहेत. त्‍यामुळे रत्‍नागिरी विभागातील शहर, ग्रामीण वाहतुकीसाठी बसेसची कमतरता भासत असून तब्‍बल १०० नव्‍या एसटी बसेसचा प्रस्‍ताव विभाग नियंत्रक आश्वजित जानराव यांनी एसटी महामंडळाला पाठवला आहे.

रत्‍नागिरी विभागात शहर, ग्रामीण मिळून तब्‍बल ७५० एसटी बसेस होत्‍या. यावेळी वाहतूक सुरळीत सुरू होती. दररोज हजारो-लाखो प्रवासी एसटी बसेसचा लाभ घेत आहेत. मात्र मागील काही महिन्‍यात १५० हून अधिक एसटी बसेस भंगारात गेल्‍या आहेत. त्‍यामुळे एसटी बसेसची कमतरता भासत आहे. सध्या ६५० एसटी बसेस शिल्‍लक असून त्‍याची वाहतूक सुरू आहे. आणखी काही दिवसात २४६ एसटी बसेस भंगारात जाणार आहेत. त्‍यामुळे बसेसची संख्या कमी होवून वाहतूकीवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. उन्‍हाळी सुट्टी, सणासुदीत एसटी बसेसची संख्यामुळे वेळापत्रकावर परिणाम होत आहे.. तरीही रत्‍नागिरी विभागाच्‍या वतीने आहे त्‍या एसटी बसेसमध्ये सेवा देण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. मात्र बिघडलेले वेळापत्रक, उशिरा गाड्या येणे, ब्रेकडाऊन होणे यासह विविध समस्‍यामुळे प्रवासी वैतागली आहेत. त्‍यामुळे विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी १०० नव्‍या राजमाता एसटी बसेस मिळण्यासाठी एसटी महामंडळास प्रस्‍ताव पाठवला आहे. जर नव्‍या बसेस, ई-बसेस, स्‍मार्ट बसेस विभागात आल्‍या तर वाहतूक सुरळीत होईल, प्रवाशांना दर्जेदार सेवा देता येईल एवढं मात्र निश्चित आहे.

बसेस आल्‍यास रिक्‍त पदे भरावी लागतील

रत्‍नागिरी विभागात बसेसबरोबरच चालक, वाहकासह इतर पदे मोठ्या प्रमाणात रिक्‍त आहेत. कंत्राटी पध्दतीने भरती होणार असल्‍याचे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले आहे. अद्यापतरी हालचालीस वेग आलेला नाही. रत्‍नागिरी विभागात नवीन एसटी बसेस आल्‍यानंतर चालक, वाहकांची कमतरता भासणार आहे. त्‍यामुळे चालक,वाहक, यांत्रिक पदे भरण्याची गरज आहे. रिक्‍त्त पदे भरल्‍यास इतर कर्मचाऱ्यांवरील भार कमी होईल. तसेच प्रवाशांना सुरक्षित तसेच दर्जेदार बससेवा पुरवणे शक्‍य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT