रत्नागिरी : सवलतधारकांना आता प्रवास करण्यासाठी आधार ऐवजी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, जिल्ह्यासह राज्यभरात नोंदणीस सुरुवात झाली आहे. रत्नागिरी शहरात आतापर्यंत 250 जणांनी कार्डची नोंदणी केली आहे. रत्नागिरी नवीन बसस्थानकात या कार्डची नोंदणी सुरू आहे. कार्ड काढण्यासाठी सवलतधारकांनी मोठी गर्दी केली आहे. कार्डची सक्ती नाही मात्र लवकरात लवकर कार्ड काढावे, अन्यथा एसटी बसमधील प्रवासात सवलत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.
बोगस आधारकार्ड दाखवून विविध प्रवासी एसटीचा प्रवास करीत असल्यामुळे बोगस प्रवाशांवर चाप बसवण्यासाठी तसेच महिला, 65 वर्षांवरील, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असलेल्या योग्य सवलतधारकांनाच प्रवास करण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी हे स्मार्ट कार्ड नोंदणीस प्रारंभ केले आहे. अवघ्या काही दिवसांत राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक बसस्थानकावर दिलेल्या एजंटद्वारे स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात एक लाख कार्ड काढण्याचे उद्दिष्ट असून बसस् थानकात कार्ड नोंदणी सुरू आहे. कार्ड काढण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत.
ही कागदपत्रे आवश्यक
स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. महिला, 65, 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना स्वता उपस्थित रहावे लागणार आहे. आधारकार्ड व सोबत 199 रुपये असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांचा हाताच ठसा घेण्यात येणार आहे.
ठळक बाबी
- सकाळी 9.30 ते 1, दुपारी 2 ते 4.30 या वेळेत नोंदणी बसस्थानकात सुरू
- कार्ड नोंदणी रविवार बंद असणार
- रत्नागिरी तालुक्याला एक लाख कार्ड काढण्याचे उद्दिष्ट
- आतापर्यंत 250 कार्डची तर राज्यात 10 हजार कार्डची नोंदणी
- प्रत्येक जिल्ह्यात व राज्यभरातील बसस्थानकात एजंटची नेमणूक
एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी राज्यभरातील प्रत्येक आगारात सुरू झाली आहे. मात्र एसटी प्रवासात अद्याप स्मार्ट कार्डची सक्ती केलेली नाही. सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्यावे.रोहन देसाई, सहा. जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ, मुंबई