रत्नागिरी : दिवाळीनिमित्त प्रवाशांचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले होते. गावी जाणाऱ्या व परतीच्या प्रवाशांची वाढलेली गर्दी रत्नागिरी एसटी विभागाच्या पथ्यावर पडली आहे. ६ ते १५ नोव्हेंबर या विशेष वाहतुकीतून अवघ्या ९ दिवसांत रत्नागिरी विभागाला १ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. गर्दीच्या काळात केलेले अतिरिक्त बससेवेचे नियोजन उत्पन्न वाढीसाठीही फायदेशीर ठरले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने गावी परततात. सण साजरा करून पुन्हा कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचीही गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांचा ओघ लक्षात घेवून रत्नागिरी एसटी विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत जादा बसेसचे नियोजन केले होते. मुंबई, पुणेसह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, बीड, विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात दिवाळीसाठी बसेस धावल्या. गावी ये-जा तसेच पर्यटनासाठी प्रवाशांची यंदाही हक्काच्या लालपरीलाच पसंती दिली. भाऊबीज, पाडव्या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे उत्पन्नवाढीस कारणीभूत ठरली. तब्बल १ कोटीहून अधिक उत्पन्न रत्नागिरी विभागाला मिळाले आहे.
सवलतधारकांनी घेतला लाभ
दिवाळीत ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ६५ वर्षापुढील, महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या काळात सवलतधारकांनी मोठ्या प्रमाणात लालपरीतून प्रवास केला. सर्वाधिक प्रवास महिलांनी केला आहे.