रत्नागिरी : रत्नागिरी विभागात 2025 यावर्षी चालकांकडून एसटी बसेस चालवल्या. मात्र, काहींनी निष्काळजीपणामुळे तर ब्रेकफेल, टायर फुटल्यामुळे, काही रस्त्यांच्या कामामुळे, तांत्रिक कारणामुळे एसटी अपघात झाले. 2024 व 2025 या दोन वर्षांत किरकोळ, गंभीर, प्राणांतिक मिळून 355 एसटी अपघात झाले असून त्यामध्ये 195 गंभीर अपघात आहेत, तर 2025 यावर्षी रत्नागिरी विभागात 182 एसटी अपघात झाले आहेत. त्यामध्ये 99 अपघात गंभीर, 76 किरकोळ तर उर्वरित सात अपघात प्राणांतिक आहेत. एसटीकडून दरवर्षी सुरक्षा अभियान घेऊनही एसटी अपघातात वाढ होत आहे.
राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करण्यात येते. सेवापूर्व प्रशिक्षण 48 दिवसांचे असते. उजळणी प्रशिक्षण तसेच ज्या चालकांच्या हातून अपघात झाला आहे, अशा चालकांना तत्काळ 11 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. शिवशाही चालकांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने चालकांची वैद्यकीय व नेत्रतपासणी केली जाते. 40 वर्षांच्या आतील चालकांची वर्षातून एकदा तर 40 वर्षांवरील चालकांची दरवर्षी तपासणी केली जाते. या शिवाय त्यांचे कौन्सिलिंगही करण्यात येते.
दरम्यान, मद्य प्राशन करून चालकाच्या हातातून अपघात होऊ नये, यासाठी चालकाची अल्कोहोल टेस्टही केली जाते. त्यासाठी प्रत्येक आगारासाठी अल्कोहोल टेस्ट चाचणीचे मशिनही देण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे कित्येक वेळा एसटी डिव्हायडर, डोंगराला, झाडाला आदळली आहे. कित्येकवेळा शहरातील कित्येक भागांत एसटी पलटली आहे. उपाययोजना करूनही एसटीच्या अपघाताची संख्या घटण्याऐवजी संख्या वाढत आहे.
2025 मध्ये गंभीर अपघात संख्येत वाढ
रत्नागिरी विभागात 2024 यावर्षी 173 एसटीचे अपघात झाले होते. तर 2025 मध्ये याचे प्रमाण 182 वर गेले आहे. किरकोळ, प्राणांतिक अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी गंभीर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.