Ratnagiri SP Nitin Bagate 
रत्नागिरी

Ratnagiri SP Nitin Bagate: रत्नागिरीचे एसपी नितीन बगाटे यांची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’साठी निवड

AI आधारित RAIDS अॅपची राष्ट्रीय स्तरावर दखल; भारतातील ‘प्रथम पाच’ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये निवड

पुढारी वृत्तसेवा

Ratnagiri SP Nitin Bagate

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेसाठी भारतातील ‘प्रथम पाच’ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS अॅपचे सादरीकरण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

RAIDS अॅपच्या माध्यमातून अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची माहिती एकत्रित स्वरूपात संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्रे आणि अन्य माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. मृतदेहाची अवस्था खराब झाल्यामुळे चेहरा ओळखणे कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करून मृतदेहाची ओळख पटविण्यास मदत केली जाते.

तसेच, बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी त्यांच्या चेहऱ्याची १०८ विविध रूपे तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात येत आहे. RAIDS अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ बेवारस व कुजलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये मृतदेहांची यशस्वी ओळख पटविण्यात आली आहे.

तसेच, जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी सात प्रकरणांमध्ये RAIDS अॅपच्या सहाय्याने ओळख पटविण्यात यश आले आहे. याशिवाय, अॅपमध्ये एकूण ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा शोध घेण्यातही यश आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे तसेच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या RAIDS अॅपची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेसाठी देशातील ‘प्रथम पाच’ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये झालेली निवड ही रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली उल्लेखनीय दखल मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT