रत्नागिरी : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मंगळवारी उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी एकाचदिवशी तब्बल ६ सराईत आणि कुख्यात गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अत्यंत कठोर आदेश पारित केले आहेत.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हद्दपार करण्यात आलेले हे सर्व ६ जण गंभीर स्वरूपाच्या अमली पदार्थ विरोधी कायदा गुन्ह्यांशी संबंधित आहेत. ज्यामुळे तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्जच्या विळख्याविरुद्ध प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट होते.
या धडक कारवाईत हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांमध्ये सचिन राजाराम म्हापुसकर (रा. गवळीवाडा, रत्नागिरी), अरमान लियाकत धामस्कर (रा. जे. के. फाईल्स, रत्नागिरी), नजफ असिफ मिरजकर (रा. गवळीवाडा, रत्नागिरी), मस्तान मकदूम शेख (रा. मच्छीमार्केट बाजारपेठ, रत्नागिरी), फुरकान यासीन फणसोपकर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) आणि अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर (रा. कर्ला, रत्नागिरी) या सहाजणांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. या आदेशामुळे या गुन्हेगारांचे चारही जिल्ह्यांमधील प्रवेश बंद झाले आहे.
तीन वर्षांत २१ जण हद्दपार
उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत एकूण २१ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याची धडक मोहीम राबवली आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, या २१ हद्दपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये एनडीपीएस गुन्ह्यांमधील तब्बल १४ आरोपींचा समावेश आहे. अमली पदार्थांच्या तस्करी व अवैध व्यवहारांमुळे वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी प्रशासनाने केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सखोल आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.