चाकरमानी परतीच्या प्रवासाला..!  
रत्नागिरी

Ganpati Visarjan | चाकरमानी परतीच्या प्रवासाला..!

रेल्वे स्थानके, एसटी स्टँड, खासगी बस तळांवर गर्दी; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परतीच्या वाहनांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी/ सिंधुदुर्ग : गौरी-गणपतीच्या उत्सवामुळे गेल्या काही दिवसांपासून चाकरमान्यांच्या आगमनाने गजबजलेली गावे आता पुन्हा शांत होऊ लागली आहेत. शनिवारी गौरी-गणपती विसर्जनानंतर सायंकाळपासूनच रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांनी मुंबई, पुण्यासह विविध शहरांतील आपल्या कामाच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. रविवारी पहाटेपासूनच रेल्वे, एसटी बस, खासगी आरामबस थांबे प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान, काही दिवसांपासून मुलाबाळांच्या गोंगाटाने, नातेवाईकांच्या भेटीगाठींनी आणि सणाच्या उत्साहाने गजबजलेल्या गावागावांतील घरांमध्ये आता पुन्हा शांतता पसरू लागली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबांतील सदस्य नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यांसह विविध शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र, वर्षभर शहरातील धावपळीचे जीवन जगत असताना गौरी-गणपतीचा सण म्हणजे आपल्या मातीशी, घराशी आणि गावाशी पुन्हा नाते जोडण्याचा हक्काचा दिवस मानला जातो. या वर्षी गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कुटुंबासह आपल्या मूळ गावी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गावातील घराघरांत पाहुण्यांची वर्दळ, मुलांचा गोंगाट, नातेवाईकांच्या भेटीगाठी, गणपती आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे उत्साहाचे वातावरण होते.

शनिवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मात्र या उत्सवी वातावरणाला निरोप देण्यास सुरुवात झाली. सोमवारी कामावर रुजू व्हावे लागणार असल्याने अनेकांनी रविवारचा दिवस परतीच्या प्रवासासाठी निवडला. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर पुणे, मुंबईकडे धावणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली. एसटी बस, खासगी आरामबस आणि खासगी वाहनांमधून चाकरमानी मुंबई-पुण्याच्या दिशेने रवाना होत होते.

पहाटेपासून रेल्वे स्थानकांवर गर्दी

जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर रविवारी पहाटेपासूनच प्रवाशांची लगबग सुरू झाली होती. सकाळच्या जादा रेल्वेसाठी मोठ्या संख्येने प्रवासी स्थानकावर दाखल झाले होते. हातात सामानाच्या बॅगा, डोक्यावर गठ्ठे आणि सोबत लहान मुले अशा अवस्थेत चाकरमानी आपल्या शहराकडे रवाना होताना दिसत होते.

बाजारपेठेतही चाकरमान्यांची गर्दी

परतीच्या प्रवासापूर्वी अनेक चाकरमान्यांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. शहरातील नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सहकाऱ्यांसाठी कोकणी खाद्यपदार्थ व स्थानिक वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठेतील कोकणी मेव्याची दुकाने तसेच हॉटेल्स ग्राहकांनी फुलून गेली होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेलाही काही दिवस मोठी चालना मिळाली.

आता पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा    

रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या परतीच्या प्रवासामुळे काही दिवसांपूर्वी गजबजलेली घरे पुन्हा शांत होऊ लागली. काही घरांना कुलूप लागले, काही घरांच्या अंगणात कालपर्यंत सुरू असलेल्या गप्पा थांबल्या आणि रस्त्यांवरची वर्दळही कमी झाली. काही दिवसांसाठी गावात आलेली माणसे पुन्हा शहराकडे परतल्याने गावे पुन्हा सुनी-सुनी होऊ लागली आहेत. गणेशोत्सवाच्या आनंददायी आठवणी सोबत घेऊन चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असून, आता पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT