चिपळूण : चिपळुणात शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत तालुकाप्रमुख विनोद झगडे हे माजी खा. विनायक राऊत यांचे स्वागत करताना. सोबत नेते आ. भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख संजय कदम आदी. pudhari photo
रत्नागिरी

रत्नागिरी : शिवसेना ‘उबाठा’ अलर्ट मोडवर!

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांच्याकडील नव्या जबाबदारीनंतर सेना कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कोकणचे सुपुत्र व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून घोषणा झाल्यानंतर कोकणातील शिवसेना अलर्ट मोडवर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील बदल लक्षात घेता शिवसेना उबाठाचे माजी खा. विनायक राऊत अ‍ॅक्शन मोडवर आले असून त्यांनी चिपळूणमध्ये पदाधिकार्‍यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपाने महाराष्ट्र राज्याची धुरा सोपविली आहे. एक कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोकणसह मुंबई भागातून भाजपला यश मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आणि भाजपसह मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रायगड, रत्नागिरीमधील दोन्ही खासदार महायुतीचे निवडून आले. या शिवाय विधानसभेत देखील कोकणामध्ये महायुतीलाच मोठे यश मिळाले. त्यामुळे त्यांच्यावर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या भागात महायुतीचे आमदार निवडून आणण्यात आ. रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी आ. रवींद्र चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली. त्यामुळे शिवसेना उबाठाचे अनेक उमेदवार पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून भास्कर जाधव हे विजयी झाले. भाजप व महायुतीच्या वाटचालीमध्ये आ. रवींद्र चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने पक्षश्रेष्ठींकडून त्यांना बक्षीस देण्यात आले आहे. मात्र, भाजपमधील या बदलामुळे शिवसेना उबाठा अधिक सक्रिय झाली आहे.

गत लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खा. विनायक राऊत यांनी शहरात तालुक्यातील व शहरातील पदाधिकार्‍यांसमवेत संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सूचना देखील केल्या. लवकरच नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होणार आहे. या दृष्टीने कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विधानसभेतील अपयशाची देखील चर्चा झाली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय कदम, नेते आ. भास्कर जाधव, तालुकाप्रमुख विनोद झगडे आदींसह सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकणात होणार राजकीय उलथापालथ...

लवकरच राज्यातील महानगरपालिकांची निवडणूक जाहीर होणार आहे. भाजपच्या द़ृष्टीने मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे यावेळी मुंबई मनपावर सत्ता मिळविण्यासाठी भाजप आपली शक्ती पणाला लावणार आहे. मुंबईमध्ये आजही कोकणी टक्का मोठा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने कोकणचे सुपुत्र असलेले आ. रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे कोकणच्या दृष्टीने त्यांना मिळालेले पद महत्त्वाचे आहे. या शिवाय कोकणात भाजपची ताकद वाढविण्यासाठी आ. रवींद्र चव्हाण पुढच्या काळात मेहनत घेणार आहेत. त्यामुळे आगामी काळात कोकणातील राजकारणात उलथापालथ होणार अशी चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे.येणारर्‍या काळात काय होईल, तिकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT