अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील घटनास्थळी पाहणी करताना  Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Crime | शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; भाटिमिऱ्या येथील एकजण गंभीर जखमी

शिवीगाळ करत चाकूने पाठीवर तसेच हात-खांद्यावर वार

पुढारी वृत्तसेवा

Ratnagiri Shimgo Festival Dispute

रत्नागिरी : शिमगोत्सवाच्या वेळी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी ( दि. ७ ) सकाळी सुमारे ११ वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (५५, रा. भाटिमिऱ्या, रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी शशांक सावंत, संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिघेही रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (१ मार्च) रात्री सुमारे १० वाजता शिमगोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी पालखी येणार असल्याने भाटिमिऱ्या येथील दत्त मंदिर परिसरात रस्त्यावर मंडप उभारणे आणि रांगोळी काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तीन मुली दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाचा धक्का मंडपाचे काम करणाऱ्या फिर्यादींच्या भाचा विरेंद्र किरला याला लागला. त्यातून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यावेळी एका मुलीने सडामिऱ्या गावातील लोकांना बोलावण्याची धमकी दिली.

यानंतर काही वेळात शशांक सावंत, संजू आणि इतर काही जण तेथे आले. त्यामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र जयेंद्र नार्वेकर, रुपेश कमलाकर सावंत, मनोज सावंत, परेश सावंत आणि परिसरातील अन्य प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवला. त्यामुळे त्यावेळी शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती.

दरम्यान, शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता जयेंद्र नार्वेकर हे त्यांच्या दुचाकीने (एमएच-०८-बीएफ-२३२३) मिरकरवाडा जेटीकडे बोटीचे काम पाहण्यासाठी जात होते. ते जेटीच्या पहिल्या गेटजवळ पोहोचताच संशयित शशांक सावंत आणि संजू यांनी आपली दुचाकी त्यांच्या वाहनासमोर आडवी लावली. त्यानंतर दोघांनी त्यांना शिवीगाळ करत चाकूने पाठीवर तसेच हात-खांद्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने नार्वेकर खाली कोसळले.

त्याचवेळी रुपेश सावंत उर्फ छोटा भाई हा दुचाकीवरून तेथे आला आणि त्यानेही चाकूने नार्वेकर यांच्या पाठीवर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार पाहून घटनास्थळी लोकांची गर्दी वाढू लागल्याने तिघेही संशयित तेथून पळून गेले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका दुचाकीस्वाराला नार्वेकर यांनी आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्याचवेळी राहुल नावाचा ओळखीचा व्यक्ती तेथे आल्याने दोघांनी मिळून नार्वेकर यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने गोळा केले असून या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT