रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. जिल्ह्यातील 18 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोमवार 2 मार्च रोजी एकूण 3786 ठिकाणी होलिका दहन होणार आहे. यामध्ये 1294 सार्वजनिक तर 2492 खासगी होळ्यांचा समावेश आहे. सार्वजनिक होलिका दहन गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी, मंदिर परिसरात किंवा सार्वजनिक मैदानात पारंपरिक पद्धतीने करण्यात येते. तर खाजगी होलिका दहन घरगुती किंवा वाडीपातळीवर साजरे केले जाते. यावर्षी जिल्ह्यात सुमारे 1100 ठिकाणी पालखी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पालख्यांमध्ये ग्रामदैवतांची मूर्ती किंवा प्रतिमा सजवून ढोल-ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली जाते. पारंपरिक पोशाखातील युवक, महिलांची फुगडी, लेझीम पथके, तसेच स्थानिक कलावंतांची सादरीकरणे यामुळे शिमगोत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणित होतो.
शहरात विविध भागांत पारंपरिक विधींनी होळी साजरी केली जाते. रंगपंचमीच्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. ग्रामीण भागात होळीच्या निमित्ताने गावकऱ्यांचा सामूहिक सहभाग दिसून येतो. पारंपरिक ढोल, ताशे, झांज यांचा गजर आणि होळीभोवती फेर धरून केले जाणारे नृत्य हे या भागाचे वैशिट्य आहे. किनारपट्टी भागात शिमगोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व असून समुद्रकिनारी असलेल्या गावांत वेगळीच उत्साहाची लाट असते.
पोलिस ठाणे निहाय होलिका दहनाचा आढावा
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 11 सार्वजनिक आणि 105 खाजगी होलिका दहन होणार आहे. रत्नागिरी ग्रामीण हद्दीत 78 सार्वजनिक 133 खाजगी होलिका दहन होणार आहे. पूर्णगड 30 सार्वजनिक व 65 खाजगी,सिंगमेश्वर 99 सार्वजनिक खाजगी 168, जयगड येथे 45 सार्वजनिक आणि 166 खासगी, दाभोळ सार्वजनिक 24 सार्वजनिक व 85 खासगी, खेड तालुक्यात 150 सार्वजनिक आणि 160 खासगी, मंडणगड येथे 75 सार्वजनिक व 150 खाजगी होलिका दहन होणार आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक 150 सार्वजनिक आणि तब्बल 450 खाजगी होलिका दहन होणार आहे. बाणकोट येथे 33 सार्वजनिक होलिका दहन होणार आहे. सावर्डे येथे 43 सार्वजनिक व 110 खासगी चिपळूण 97 सार्वजनिक तर 177 खासगी, अलोरे-शिरगाव येथे 33 सार्वजनिक 89 खाजगी, गुहागर येथे 78 सार्वजनिक आणि 230 खासगी होलिका दहन होणार आहे.लांजा 96 सार्वजनिक आणि 114 खासगी नाटे येथे 30 सार्वजनिक व 40 खाजगी, देवरुख 118 सार्वजनिक आणि 108 राजापूर 104 सार्वजनिक आणि 142 खाजगी होलिकांचे दहन होणार आहे.
पोलिस प्रशासन सज्ज
जिल्ह्यातील सर्व 18 पोलिस ठाण्यांनी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन केले आहे. मोठ्या प्रमाणावर होलिका दहन आणि पालखी मिरवणुका होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख मार्गांवर वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी होळी साजरी करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, ज्वलनशील पदार्थांचा अतिरेक टाळावा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक शिमगोत्सवाची गरज अलीकडच्या काळात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. होलिका दहनासाठी झाडांची अतिरेकी तोड टाळावी, प्लास्टिक व रासायनिक पदार्थ जाळू नयेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. अनेक गावांत सुकलेल्या लाकडांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक शिमगोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. गावातील सर्व समाजघटक एकत्र येऊन सण साजरा करतात. वाद-विवाद विसरून परस्परांतील मतभेद दूर करण्याची ही संधी मानली जाते. पारंपरिक लोककला, नृत्य, वेशभूषा आणि लोकगीते यांच्या माध्यमातून कोकणची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होते. रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांत सध्या शिमगोत्सवाच्या तयारीला अंतिम टप्पा आला असून सर्वत्र उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. चाकरमानी गावाकडे दाखल होत असल्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत. किराणा दुकाने, पूजेचे साहित्य विक्रेते, तसेच फुलांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. यंदाचा शिमगोत्सव रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि प्रशासनाच्या दक्षतेखाली साजरा होणार आहे.