मंडणगड; पुढारी वृत्तसेवा : दाभोळवरून मुंबईकडे जाणारी दापोली आगाराची बस चालकाचा ताबा सुटल्याने शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळ असलेल्या एका वळणा नजीक असलेल्या दरीत कोसळली. बस सुमारे पंधरा फूट खाली दरीत गेल्यानंतर एका झाडाला व दगडाच्या आधाराने बस अडकून राहिली. त्यामुळे दरीत असलेल्या धरणाच्या पाण्यात पडून होणारा मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी रात्री मध्यरात्री घडली. (Ratnagiri Bus Accident)
बसमध्ये चालक, वाहकासह ४१ प्रवासी होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. तर ७ जणांना मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अन्यत्र पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या साहाय्याने सकाळी साडे दहाच्या सुमारास बाहेर काढण्यात आली. (Ratnagiri Bus Accident)
या अपघताबाबत सविस्तर वृत्त असे की रविवारी रात्री दाभोळ येथून मुंबईकडे (MH-14-BT 2265) ही बस निघाली. मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथील देशमुख बाग, चिंचाळी धरणाजवळ चालक व्ही. एस. गाडे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने 15 फूट खोल दरीत बस कोसळली. दरीतील झाडे, झुडपे व दगडाला बस अडकून राहिली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ सुनिल साळवी, दीपक सावंत, विकी कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींना मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातातील राजेंद्र मुरकर, आफताब ढबीर, प्रणाली राऊत, सिध्देश मोरे, भरत बाकर, प्रशांत वांयगणकर, अनिता धोपट, मनिषा धोपट, दत्ताराम धोपट, प्रथमेश जाधव, भालचंद्र भेलेकर, वसुदेव घाडे, आकाश देवरुखकर, उदय चांदोरकर, रमेश भुवड, सरिता सावंत, विशाल मोरे, अक्षय जुवळे, मुस्सबर दळवी, अब्दुल परकार, राजेश साखरकर, रोहन साखरकर, रेहमान पटेल, अक्षय धोपावकर, शशिकांत जालगांवकर, सचिन गायकर, संजय चव्हाण, मंदार भोईर, रश्मी भुवड, सान्वी आसोलकर अशी जखमींची नावे आहेत.
काही वर्षापूर्वी क्रिकेट सामने खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांचा डंपरही याच स्पॉटवरुन दरीत कोसळला होता. त्यानंतर एक खासगी गाडी खाली सरकली होती. आता एस.टी. बसचा हा तिसरा अपघात आहे. शेनाळे घाटातील दरी कडील बाजूला कोणतेही सुरक्षा कठडे नाहीत. नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीनंतर या प्रश्नावर उपाय शोधला जाईल का ? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.