रत्नागिरी : जिल्ह्यातील काही दुकानदारांनी शेतकर्यांना चांगल्या दर्जाची बियाणे विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 4 दुकानांना 1 लाख 12 हजार 64 रपये किमतीच्या बियाणे विक्री करण्यास बंदी घातली आहे. 716 किलो बियाण्यांची विक्री थांबवण्यात आली आहे. त्यामुळे बियाणे, खते विक्री दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरीत मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांनी भात, नाचणीच्या शेतीसाठी नागरणी, पेरणीची लगबग सुरू केली आहे. दरम्यान, शेतकर्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खत मिळावे म्हणून कृषी विभागाने बैठक घेवून सूचना ही देण्यात आल्या होत्या. चांगल्या दर्जाच्या बियाण्याची विक्री होत नसल्यास तालुका तक्रार निवारण समिती, जिल्हा स्ततरावरील हेल्पलाईनवर नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
दरम्यान, खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील तब्बल 40 हुन अधिक दुकानांची तपासणी केली. यामध्ये आक्षेपार्ह असे काही सापडले नाही. त्यामुळे कोणत्याही दुकानांवर कारवाई झाली नाही. तर जिल्हा अधिक्षक कृषी विभागातर्फे तालुका, शहरातील खते, बियाण्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यामुळे 4 दुकानादारांवर बियाणे विक्री करण्यास बंदी आदेश देण्यात आले आहेत.
एकूण दुकानांची तपासणी- 45
जिल्ह्यातील कारवाई झालेल्या दुकानांची संख्या-4
बियाणे विक्री थांबवली-716 किलो बियाणे
विक्री थांबवलेल्या बियाण्याची किंमत- 1 लाख 12 हजार 64 रूपये
रत्नागिरी जिल्ह्यात बियाणे, खते पुरवठा सुरळीत झालेला आहे. शेतकर्यांनी कृषी सेवा केंद्रामधून आवश्यक कृषी निविष्ठांची खरेदी करून ठेवावी तसेच बियाणे, खते व किटनाशके खरेदीचे पक्के बील घ्यावे. निविष्ठा वापर करताना सुरक्षा उपयांचे काटेकोर पालन करावे तसेच निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास हेल्पलाइन क्रमांक 8830264335 यावर संपर्क साधावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हापरिषद कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील बियाणे, खत विक्री दुकानांची तपासणी सुरू आहे. यापैकी काही दुकानात चांगल्या दर्जाचे बियाणे विक्री सुरू आहेत. काही दुकानांत दिलेल्या सूचनाचे पालन न करता बियाण्यांची विक्री केल्यामुळे अशा 4 दुकानाना बियाणे विक्री बंदीचे आदेश दिले आहेत.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी