कळवंडेत पाणी टंचाई 
रत्नागिरी

Ratnagiri Water Scarcity : कळवंडेत पाणी टंचाई; धरणात ८ टक्‍केच पाणी

आज पाटबंधारे अधिकार्‍यांसमवेत ग्रामस्थांची बैठक

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूण-कळवंडे गावात धरण असतानाही सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाचा हा परिणाम असून दुरुस्तीच्या नावाखाली धरणाची वाट लावल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. सध्या धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीही अडचणीत आली असल्याने ग्रामस्थ २२ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ११ वाजता गावात अधिकार्‍यांसोबत ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्‍यात आली आहे.

ग्रामस्थ इतकी वर्षे कळवंडेत धरणाच्या पाण्यावर भातशेती व भाजीपाला पिकवत होते. अर्ध्या शहराला पुरेल इतका भाजीपाला याच गावातून शहरात येत होता. असे असताना गरज नसतानाही ग्रामस्थांना विश्वासात न घेता तीन वर्षापूर्वी लघु पाटबंधारे विभागाने लाखो रुपये खर्च करण्यासाठी या धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम निकृष्ट करण्यात आल्याने पहिल्याच पावसात धरणाला मोठी गळती लागली. त्यामुळे धरण रिकामे ठेवण्याची वेळ लघु पाटबंधारे विभागावर आली. यामुळे ग्रामस्थांमधून मोठा उद्रेक झाला. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. यामध्ये अधिकार्‍यांनी आपल्या फायद्यासाठी धरणाची दुरुस्ती काढल्याचा आरोप सातत्याने झाला. त्यानंतर धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले. याला आता तीन वर्षे झाली. तरीही यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतापले असून त्यांनी कार्यालयवार धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या धरणात १६ टक्के पाणीसाठा असल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून ग्रामस्थांना सांगितले जात आहे. मात्र गाळाचा विचार करता हा पाणीसाठा केवळ ८ टक्के असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या धरणाच्या खालच्या बाजूला गावाला पाणीपुरवठा करणार्‍या जॅकवेल आहेत. मात्र धरणातच पाणी नसल्याने त्या आटत चालल्या असून ऑक्टोबर महिन्यातच पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. शेतीचे तर गेल्या तीन वर्षापासून नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT