पाण्यासाठी आतापासूनच वणवण! 
रत्नागिरी

Ratnagiri  Water Scarcity : पाण्यासाठी आतापासूनच वणवण!

पावसाळ्यातच टंचाईचे चटके; १८३ गावांवर संकटाचे साट

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात यंदा पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट १८३ गावांवर आतापासूनच गडद होऊ लागले आहे. पावसाळा संपताच नदी-नाले, ओढे-वहाळ आणि विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरांनाही पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. रत्नागिरी शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दापोलीत जलस्रोत आटण्याची चिन्हे दिसत आहेत. राजापूरमध्येही संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधारे उभारण्यावर भर दिला जात आहे. भूजल पातळीतील मोठी घट आणि आगामी उन्हाळ्याची चाहूल यामुळे जिल्ह्याच्या पाणी नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भूजल पातळीतील घट चिंताजनक

भूजल सर्वेक्षणाच्या निरीक्षणांनुसार जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ५.२२ मीटरपर्यंत घट नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये ही घट विशेष चिंताजनक आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीत पुरेसे पाणी मुरले नाही. परिणामी, विहिरी, कूपनलिका आणि अन्य भूजलस्रोतांवरील ताण वाढला आहे. आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अधिक कसरत करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

दापोलीत जलस्रोतांची पातळी घटतेय

दापोली तालुक्यात पावसाने लवकर निरोप घेतल्याने नद्या, ओढे आणि विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी लहान बंधारे उभारणे, विहिरींचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक ठरत आहे.

राजापुरात वनराई बंधाऱ्यांवर भर

राजापूर तालुक्यातही कमी पावसामुळे ओढे-वहाळांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत. काही ठिकाणी गणेश विसर्जनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचे चित्र यंदा दिसून आले. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून वनराई बंधारे उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT