सावर्डेत २ महिन्यांपूर्वी केलेल्या मलमपट्टीवर पुन्हा खड्डा 
रत्नागिरी

Ratnagiri News| सावर्डेत २ महिन्यांपूर्वी केलेल्या मलमपट्टीवर पुन्हा खड्डा!

चिपळूणचा उड्डाणपूल अर्धवटच; दृतगती महामार्गावर प्रत्‍यक्ष लोकार्पणापूर्वीच खड्ड्यांची मालिका सुरू

पुढारी वृत्तसेवा

गौरव पोंक्षे

माखजन : मुंबई-गोवा महामार्गावर अर्थात पनवेल कन्याकुमारी दृतगती महामार्गांवर प्रत्यक्ष लोकार्पणापूर्वी खड्डे यांची मालिकाच सुरु झाली आहे. दोन महिन्यापूर्वी सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेनजीक गोव्याच्या दिशेला दोन्ही बाजूला खड्डे बुजवण्यात आले होते. परंतु अगदी दोन महिन्यातच गोव्याकडून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर नव्याने केलेल्या कामावरच खड्डा पडला आहे. रस्त्यातील शिग बाहेर आली आहे.

असे निकृष्ठ काम करून वाहन चालक व नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम सुरु आहे. या गोष्टीकडे ना अधिकारी लक्ष देत ना लोकप्रतिनिधी. या रस्त्याच्या लोकार्पणापूर्वीच खड्डे पडतात, ते खड्डे पुन्हा खर्च करून ठराविक रस्ता फोडून कॉंक्रिटच्या सहाय्याने बुजवले जातात आणि पुन्हा त्याच ठिकाणी खड्डा पडतो, याला काय म्हणावं? कामाचा दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. चिपळूण ते संगमेश्वरदरम्यान या रस्त्याला भेगा गेल्या आहेत. अनेक ठिकाणी अक्षरशः रस्ता खडबडीत झाला आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे सारे येथील जनतेला सोसावे लागत असल्‍याचे बोलले जात आहे.

पनवेल ते कन्याकुमारी या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे वारंवार बोलले जाते. पण नेमका हा रस्ता अधिकृत केव्हा पूर्ण होणार, हे अनुत्तरितच आहे. मंत्र्यांची पोकळ आश्वासने आणि कुर्मगतीने सुरु असलेले काम यामुळे नागरिक व वाहनचालक कंटाळले आहेत. चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम गणपतीपूर्वी पूर्ण होणार होते. परंतु गणपती विसर्जनाला २ महिने झाले तरी चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. उड्डाणपूल सुरु झाल्यापासून उड्डाणपुलाच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली नेहमीच पहायला मिळते.

सुरू असलेल्या कामामुळे धुळीचा त्रास

शहर असल्याने सर्व्हिस रोडवरती साहजिकच गतिरोधक आहेत. या गतिरोधकामुळे मोठमोठाले कंटेनर सतत आपटत असतात. याचा आवाज शहरातील रहिवाशांना रात्रंदिवस सोसावा लागत आहे. शिवाय सुरु असलेल्‍या कामामुळे धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे. आज ना उद्या उड्डाणपूल सुरु होईल, या आशेवर दिवस ढकलणाऱ्या चिपळुणातील रहिवाशांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. शाळकरी मुले, सायकलस्वार, पादचारी या मार्गांवरून ये-जा करत असतात. सर्व्हिस रोडवरून मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची वाहने असल्याने अनेक अपघात झालेले चिपळूणकरांनी अनुभवले आहेत. त्यामुळे या उड्डाणंपूलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्याचे ट्रॅफिक वाढणार, असेही बोलले जात आहे. पनवेलहून दक्षिणेत जाणारी वाहने आहेत, ती कोल्हापूर मार्गे न जाता गोवामार्गे कमी अंतर होत असल्याने या मार्गे जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे साहाजिकच या रस्त्यावरील वाहतूक वाढू शकते. परंतु या सगळ्या आधीच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचा पृष्ठभाग कुठेच सपाट नाही. त्यामुळे वाहनदेखील उथळ गचके देत पुढे जाते. या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार शासन करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चिपळूणचा उड्डाणपूल तात्काळ पूर्ण करा आणि संगमेश्वर ते चिपळूण रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवा, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT