सावित्री नदी 
रत्नागिरी

Ratnagiri News : सावित्री नदी परिसराच्या विकासासाठी प्रयत्न गरजेचे

जल वाहतूक, व्यापारउदिमातून समृद्धता शक्य, पूर्वाश्रमीच्या समृद्धतेसाठी प्रयत्नाची गरज

पुढारी वृत्तसेवा

विनोद पवार

मंडणगड : बंदर विकास मंत्रालयाच्या माध्यमातून कोकणातील जलमार्गे प्रवासी जलवाहतूक, व्यापारउदीम या सध्या अवलंबलेल्या धोरणाचे स्वागत होत आहे. त्या माध्यमातून कोकणातील प्रमुख नद्यांमध्ये गणना होत असलेल्या सावित्री नदीच्या विकासातून येथील किनारपट्टी भागात असलेली पूर्वाश्रमीची समृद्धता निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी आता होत आहे.

जलमार्गाच्या काळात सावित्री नदीमार्गे होणारी जलवाहतूक, व्यापार उदीम व येथील कोकणी संस्कृतीचे आजही ही नदी साक्ष देते. मात्र, रस्ते मार्ग विकासानंतर नदीच्या किनारपट्टी भागात निर्माण झालेली समृद्धता हरपली. येथील किनारी भागातील समृद्ध जनजीवनाची घडी बऱ्याचअंशी विस्कळीत झाली. महाबळेश्वर येथे उगम पावणारी ही नदी महाड, मंडणगड परिसरातून वाहत बाणकोट खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते. नदीचा वापर पूर्वी प्रमुख जलमार्ग म्हणून होत असे. सावित्री नदीतून अरबी समुद्रातून मोठ्या शहरांतील बाजारपेठेत जाणारा जलमार्ग त्याकाळी विकसित होता. महाड, मंडणगड मधील बाणकोट बंदर त्या काळात महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. नदीमार्गे तांदूळ, नारळ, सुपारी यांसारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे बोलले जाते. या व्यापारामुळे नदीकाठची गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली होती. पूर्वीच्या काळात सावित्री नदी ही स्थानिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग राहिली असून तशी ती आजही आहे.

नदीकाठावर वसलेली गावे मासेमारीसाठी नदीवर आजही अवलंबून आहेत. बंदरांच्या विकासामुळे व्यापार उदीम रस्तेमार्गाच्या तुलनेत सुलभपणे साधता येवू शकतो, तालुक्यात किनारपट्टीवर बॉक्साइट खनिजाचे मुबलक साठे आहेत. या खनिजाचा व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातीच्या दृष्टीने करायचा झाल्यास बंदरे विकसित करून सुसज्ज जेटी व त्यासबंधी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय मंडणगड व किनारपट्टीवरील अन्य तालुक्यात निर्माण होऊ शकणारे प्रकल्प, उद्योग या करिता सुद्धा जलवाहतूक हा पर्याय अधिक सोयीचा ठरू शकतो.

सावित्री नदी किनारपट्टी भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी आणि पर्यटनावर अवलंबून आहे. बंदरे विकसित केल्यास मासेमारी व्यवसायासह जलवाहतूक, पर्यटन वाढीसाठी चालना मिळू शकते व त्या अनुषंगाने येथील स्थानिक अर्थकारण सुधारण्यास हातभार लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT