सावर्डेत प्लास्टिक बॉटल संकलन हाऊस 
रत्नागिरी

Ratnagiri News : सावर्डेत प्लास्टिक बॉटल संकलन हाऊस

जि. प. सदस्या पूजा निकम यांच्याकडून स्वच्छतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सावर्डे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सावर्डे गावात प्लास्टिक कचरा मुक्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला असून गाव, बाजारपेठ तसेच वाडी-वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी प्लास्टिक बॉटल संकलन हाऊस (कचरा कुंड्या) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाबाबत जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. परिसरातील प्लास्टिक बॉटल्स व अन्य कचरा रस्त्यावर किंवा आजूबाजूला न फेकता संकलन हाऊसमध्ये टाकावा, ओला कचरा घंटागाडीत द्यावा, असे त्यांनी सांगितले. प्लास्टिक कचरा शेकडो वर्षे न कुजल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. तसेच नाल्यांत प्लास्टिक अडकल्याने सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती व विविध आजारांचा प्रसार होतो, असेही त्यांनी नमूद केले.घरोघरी प्लास्टिक कचरा वेगळा जमा करावा, ओल्या कचऱ्यासाठी नाडेप पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन केले.

सावर्डे गाव व वाडी-वस्त्यांमध्ये नाडेप पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून परिसर स्वच्छ ठेवणे आणि आरोग्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाअंतर्गत गाव स्वच्छ व समृद्ध करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे मत पूजा निकम यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सावर्डे गावातील संजय कोकाटे, रफिक मोडक, डॉ. कृष्णकांत पाटील, देवराज गरगटे, संजय चव्हाण तसेच पं. स. सदस्य शौकत माखजनकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT