सरस प्रदर्शनातून 63 लाख 52 हजारांची उलाढाल 
रत्नागिरी

Ratnagiri News : सरस प्रदर्शनातून 63 लाख 52 हजारांची उलाढाल

विविध कलात्मक वस्तू, मसाले, लोणची, कोकणी मेवा, सरबते, कोकणी खाद्यपदार्थांची विक्री

पुढारी वृत्तसेवा

गणपतीपुळे : गणपतीपुळे येथे 24 ते 28 डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री 2025 मधून 63 लाख 51 हजार 973 रुपयांची विक्री झाली. 50 लाख 40 हजार 68 रुपये किमतीची उत्पादन विक्री, तर 13 लाख 11 हजार 905 रुपयांची खाद्य विक्री स्टॉलवरून विक्री झाली आहे.

स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगाने प्रादेशिक, विभाग व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 2025-26 चे रत्नागिरी जिल्ह्याचे सरस प्रदर्शन व विक्री 2025चे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या प्रदर्शनाला वाढणारा प्रतिसाद बघून 83 स्टॉलची बांधणी करण्यात आली होती. यामध्ये 64 उत्पादने स्टॉल व 19 फूड स्टॉल समूहांना उपलब्ध करून देण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविधप्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरूड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी), विविधप्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले), पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोह्याचे, ओव्याचे इत्यादी), लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी), कोकम, आगळ, कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे), विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप), रस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी), जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध शोभिवंत फुलझाडे, बोन्साय इत्यादी), मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले होते. यामध्ये प्रभाग संघातील महिला, अधिकारी, कर्मचारी तसेच गणपतीपुळे येथे भेट देणा-या पर्यटकांनीसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यात बासुरी वादन, कथ्थक गीत गायन यामध्ये सहभाग घेतला. पाककला स्पर्धा गोड व तिखट पदार्थ, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट विक्री उत्पादने, उत्कृष्ट विक्री फूड स्टॉल यासाठी स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.

पाककला स्पर्धा गोड पदार्थमध्ये अर्चना संतोष साळवी प्रथम क्रमांक, अस्मिता बिपीन तोडणकर द्वितीय क्रमांक, प्रियांका नीलेश बहुतले तृतीय क्रमांक, तर पाककला तिखटमध्ये पायल प्रशांत कदम प्रथम क्रमांक, स्वरा वैभव देसाई द्वितीय क्रमांक आणि रविना कल्पेश गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट मांडणीमध्ये धनलक्ष्मी स्वयंसाहाय्यता समूहाला प्रथम क्रमांक, सृष्टी स्वयंसाहाय्यता समूहला द्वितीय क्रमांक, नारीशक्ती स्वयंसाहाय्यता समूहाला तृतीय क्रमांक मिळाला, तर श्रेय महिला उत्पादक गटाला उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट विक्री उत्पादनमध्ये भक्ती स्वयंसाहाय्यता समूहाला प्रथम क्रमांक, कोकण कलश महिला शेतकरी उत्पादक कंपनीला द्वितीय क्रमांक, तर उद्योगरत्न महिला प्रभागसंघाला तृतीय क्रमांक देण्यात आला. उत्कृष्ट विक्री फूड स्टॉलमध्ये संकल्प स्वयंसाहाय्यता समूहाला प्रथम क्रमांक, धनज्योती महिला प्रभागसंघाला द्वितीय क्रमांक व भरारी स्वयंसाहाय्यता समूहाला तृतीय क्रमांक मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT