‘टीप टीप बरसा पाणी..!’ एस.टी. बसेसची दयनीय अवस्था 
रत्नागिरी

Ratnagiri : ‘टीप टीप बरसा पाणी..!’ एस.टी. बसेसची दयनीय अवस्था

पावसाळ्यात छतातून गळणारे पाणी अंगावर पडून कपडे होत आहेत खराब

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय,’ या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रवाशांची सेवा करण्याचा वसा उचलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाकडून ऐन पावसाळ्यात गळकी गाडी देऊन प्रवाशांचा छळ होत असल्याचा प्रकार दररोज होत आहे. जिल्ह्यात दिवसरात्र धो- धो पाऊस पडतच आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र एसटीची दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात जुन्या बसेस सर्रास गळत आहेत. छतावरून टीप टीप पाणी गळत आहे. काही आसनांवरच पाणी पडत असल्यामुळे बसण्यासाठी जागा मिळत नाही. कित्येकांचे कपडे ही पाण्यामुळे घाण होत आहे. गळक्या एसटीमुळे शाळा-महाविद्यालयीन, नोकरदारवर्ग, दररोजचा प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे कोणी लक्ष देत का लक्ष, अशीच आर्त हाक प्रवासी देत आहेत.

एकीकडे रत्नगिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे एसटीची दैना झाली आहे. जुलै महिना अद्याप संपलेला नाही. आणखी ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडत असतो. त्याआधीच एसटीची बिकट परिस्थिती झाली आहे. रत्नागिरी आगारासह आठ आगाराच्या बसेस रस्त्यावर धावतात. जिल्हांतर्गत रत्नागिरी-लांजा. रत्नागिरी -राजापूर, पावस, काजीरघाटी, जयगड, देवरूख, चिपळूण यासह शहर, जिल्हाअंतर्गत प्रवास करणार्‍या लालपरी गळक्या आहेत. छत गंजल्यामुळे व विविध कारणांमुळे छत गळत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाईलाजास्तव प्रवाशांना थांबून प्रवास करावा लागत आहे. काही एसटी तर पूर्ण गळत आहे. सर्व आसनांवर पाणीच पाणी साचत आहे. त्यामुळे विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देवून रत्नागिरीसह 8 डेपोतील ज्या ज्या एसटी गळत आहेत त्या तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा न गळणार्‍या बसेस किंवा नवीन बसेस मार्गावर सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी, नागरिक करत आहेत.

पावसाळ्यापूर्वीच ज्या काही जुन्या बसेस आहेत, ज्या गळतात त्या दुरुस्ती केल्या आहेत. दुरुस्तीचे काम करूनच रस्त्यार गाड्या धावत आहेत. सर्रास एसटी बसेस ग्रामीण भागात धावत असल्यामुळे छतावर, साईडला झाडांच्या फांद्या लागतात त्यामुळे ही काही ठिकाणी पाणी गळते. यावर उपाय म्हणून रस्त्यातील झाडे तोडा म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतींना पत्र देण्यात येणार आहे. एसटी गळत असल्याच्या आम्हाला ही तक्रारी आल्या आहेत. लवकरच उपाययोजना केल्या जातील.
संदीप पाटील, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT