रत्नागिरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई राज्यातील खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतून एकूण 1 लाख 5 हजार 582 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आल आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 655 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवेशासाठीची निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत दिली असून या मुदतीत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
आरटीईसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील 92 शाळांमध्ये 804 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी 1 हजार 78 अर्ज प्राप्त झाले होते. नुकतीच लॉटरी जाहीर झाली असून 655 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध गटातील विद्यार्थ्यांचा समावेश. पसंती शाळा नसल्यामुळे गतवर्षी 126 जागा रिक्तच होत्या. यंदाच्या वर्षी आरटीईसाठी संपूर्ण विद्यार्थी प्रवेश घेणार का, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी जागा रिक्त राहणार हे लवकरच कळेल.
सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाईलवर प्रवेशासाठी एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. पालकांनी मॅसेजची वाट न पाहता शासनाच्या वेबसाईटवर जावून सोडत तपासून प्रवेशासाठी निवड झाली आहे का नाही याची पाहणी करावी असेही आवाहन करण्यात आले.