दुष्काळात आता शेतकऱ्यांना दीपावलीची भेट! 
रत्नागिरी

Ratnagiri News| दुष्काळात आता शेतकऱ्यांना दीपावलीची भेट!

२२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ११.२७ कोटींची अग्रिम मदत जमा; ७२.७० टक्के वाटप पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ४७१ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ कोटी २७ लाख ५५ हजार रुपयांची अग्रिम मदत जमा झाली आहे. आतापर्यंत ७२.७० टक्के शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दीपावलीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले. त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला. भातपिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या झळा लक्षात घेऊन कृषी व महसूल विभागाने बाधित पिकांचे पंचनामे केले आहेत. पीक नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

त्यानुसार दीपावलीसाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५ हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली आहे. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना इतर संबंधित खातेदारांचे संमतीपत्र सादर करावे लागणार आहे. काही खातेदार बाहेरगावी राहत असल्याने त्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे संमतीपत्र सादर करू न शकणाऱ्या खातेदारांना दीपावलीपूर्वी अर्थसहाय्य मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता व्‍यक्‍त होत आहे.

पडताळणीची प्रक्रिया पूर्ण...

अग्रिम मदतीसाठी विकसीत केलेल्‍या सॉफ्टवेअरचा लॉगिन आयडी केवळ तहसीलदारांना उपलब्‍ध करून देण्यात आला आहे. पोर्टलच्‍या माध्यमातून महसूल अधिकारी गावात किंवा कार्यालयातून माहितीची जलद पडताळणी पूर्ण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT