चिपळूण ः नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना निवेदन देताना गोवळकोटमधील नागरिक. 
रत्नागिरी

Ratnagiri News : रस्ता रूंदीकरणासाठी जागा मालकांना नोटीस

चिपळूण शिवाजी चौक-बहादूरशेख रस्ता रूंदीकरणासंदर्भात प्रशासनाची प्राथमिक कार्यवाही सुरू

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : शहरातील शिवाजी चौक ते बहादूरशेख रस्ता रूंदीकरणासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडून प्राथमिक कार्यवाही सुरू झाली आहे. त्यादृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यावसायिक व रहिवास इमलाधारकांना रूंदीकरणासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र या नोटीस बजावल्यानंतर संबंधित जागा मालकांकडून संभ्रम व्यक्त करत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तर दुसरीकडे गोवळकोट येथील एका जागेचे आरक्षण प्रशासनाने रद्द करण्याच्या प्रक्रियेमुळे त्या विरोधात परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत.

शहरातील शिवाजी चौक ते बहादूरेशख हा मुख्य वर्दळीचा रस्ता रूंद करण्यासाठी महिनाभरापूर्वी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने पाहणी करून रेखांकन प्रक्रिया राबवली. त्यानंतर आता प्रशासनाकडून रूंदीकरणाच्या कार्यवाहीला प्राथमिक स्तरावर सुरूवात झाली आहे. त्यानुसार संबंधित मार्गावरील दोन्ही बाजूकडील रहिवास व व्यापार इमारत धारकांना प्रशासनाकडून नोटिस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस अंतर्गत संबंधित जागा मालकांना या मार्गावरील रस्त्याचे सुमारे 15 मीटर रूंदीकरण होणार आहे. त्यानुसार सद्यस्थितीत असलेल्या रस्त्याच्या रूंदीपेक्षा आवश्यक जागा ताब्यात घेतली जाणार आहे. त्याप्रमाणे संबंधित जागा मालकांनी याबाबत सूचना व हरकती नोंदवाव्यात. तसेच जागेचा मोबदला अथवा वाढीव क्षेत्रफळ याबाबतही प्रशासनाकडे मागणी करावी, अशा स्वरूपाची नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसमध्ये संबंधित मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या जागेचे क्षेत्रफळ किती आहे? त्याचा जागा मालक कोण आहे? तसेच रूंदीकरणात किती जागा घेतली जाणार आहे? हरकत नोंदवण्यासाठी किती कालावधी आहे? अशा अनेक विषयांची सविस्तर माहिती नसल्याने काही जागा मालकांचा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवाजी चौक ते बहादूरशेख हा संपूर्ण मार्ग 15 मी. रूंदीचाच होणार की कमी-जास्त प्रमाणात रूंद केला जाणार, त्याचा मोबदला कोणत्या दराने मिळणार, मोबदल्याची रक्कम कधी मिळणार, अशा अनेक शंका जागा मालकांकडून उपस्थित होऊ लागल्या आहेत.

गोवळकोट शाळा आरक्षण रद्द करण्यासाठी नगराध्यक्षांना निवेदन

तसेच दुसरीकडे प्रशासनाने महिनाभरापूर्वी गोवळकोट येथील स्वयंभू गणपती मंदिराशेजारी मालमत्ता सर्व्हे क्र. 170/3ब, शहर सर्व्हे क्र. 782 येथील आरक्षण क्र. 15 व 16 जे प्राथमिक शाळेसाठी आरक्षित करण्यात आले होते ते रद्द करण्याचे निवेदन प्रसिद्ध केले होते. निवेदन प्रसिद्ध झाल्यावर या विभागात परिसरातील नागरिकांनी आरक्षण रद्द करू नये, त्याचप्रमाणे ही जागा तातडीने विकसीत करावी, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सकपाळ यांना दिले आहे. निवेदन अंतर्गत संबंधित जागा तातडीने विकसीत करावी व संबंधित मालकाला नियमानुसार मोबदला द्यावा, अशा स्वरूपाची मागणी केली आहे. हे निवेदन देताना वसंत हरवडे, विजय खापरे, दीपक निवाते, संदीप बांद्रे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT