चिपळूण : तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे भरधाव मोटारसायकलने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार अशोक कृष्णा राणे (५६, रा. कोळकेवाडी जोशीवाडी) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी संजय श्रीकांत पवार (४०, रा. नांदीवसे गणेशपूरवाडी, ता. चिपळूण) यांच्यावर अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मृताचे वडील अशोक कृष्णा राणे हे त्यांच्या मालकीची मोटारसायकल (क्र. एमएच-०८-एझेड-०९९६) घेऊन कोळकेवाडी येथून शिरगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडले होते. पेट्रोल भरून परत घरी येत असताना, शिरगाव कडून चिपळूणकडे जाणाऱ्या एचएफ डीलक्स मोटारसायकलने (क्र. एम-०८-एव्ही-९६०३) त्यांना पिंपळी बुद्रुक येथे समोरून जोरदार धडक दिली. दुचाकीवरील चालक संजय श्रीकांत पवार (४०, रा. नांदीवसे गणेशपुरवाडी, ता. चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात व रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवून ही धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या अपघातात अशोक राणे हे गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे अशोक राणे यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अशोक राणे यांना उपचारास दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या अपघातात दुचाकीस्वार चालक संजय श्रीकांत पवार हा देखील जखमी झाला असून, त्याच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मृत अशोक राणे यांचे सुपुत्र संकेत अशोक राणे ( २७) यांनी दिलेल्या खबरीवरून अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चालक संजय श्रीकांत पवार याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.