अनुज जोशी
खेड : शहरातील प्रभाग क्र. 3 हा जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला असून, शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे या भागाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 2,044 असून त्यात अनुसूचित जाती 72 आणि अनुसूचित जमाती 13 इतकी आहे.
या प्रभागाच्या उत्तरेस मौजे भरण्याची हद्द, पूर्वेस अण्णाचा परा, दक्षिणेस जगबुडी नदी आणि पश्चिमेस प्रभाग क्र. 4 ची हद्द येते. शिवसमर्थनगर, भुवडवाडी, एस.टी. डेपो, गुलमोहर पार्क, तसेच महाड नाक्याचा काही भाग या प्रभागात समाविष्ट आहे.
गेल्या काही वर्षांत प्रभाग क्र. 3 मध्ये निवासी आणि व्यापारी संकुलांची झपाट्याने वाढ झाली असली, तरी नागरी सुविधांच्या दृष्टीने हा भाग अद्याप मागेच आहे. सार्वजनिक दिवाबत्ती, सांडपाणी निचरा आणि पाणीपुरवठा या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे नगरपरिषदेचे लक्ष अपुरे आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा दाब कमी असतो, तर काही भागात टँकरवर अवलंबून राहावे लागते.
नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची मागणी केली आहे. दक्षिणेस जगबुडी ही बारमाही प्रवाहित नदी असतानाही तिचा पिण्याच्या पाण्यासाठी पुरेपूर वापर करण्याबाबत ठोस योजना राबविण्यात आलेली नाही. या नदीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना टँकरवरील खर्चातून दिलासा मिळू शकतो, तसेच नजीकच्या दोन प्रभागांसह अग्निशमन यंत्रणेलाही पुरवठा सुलभ होऊ शकतो.
या प्रभागात खेडचे नवे बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे, क्रीडा संकुल आणि एसटी आगार आहे. त्यामुळे येथे नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, परिसरातील स्वच्छता, सुशोभीकरण आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची स्थिती अत्यंत दयनीय आहे. खड्डेमय रस्ते आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
प्रभाग क्र. 3 मध्ये शहराचा नवा चेहरा घडविण्याची क्षमता आहे. नदीकाठचा हा प्रभाग पर्यटन, क्रीडा आणि व्यापारी दृष्टिकोनातूनही विकसित होऊ शकतो. मात्र त्यासाठी नगरपरिषदेने नियोजनबद्ध आराखडा तयार करून पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती आणि स्वच्छता या मूलभूत सेवांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
(क्रमशः)