राजापूर :अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्यावतीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे व सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्याचे यावे, असा ठराव अधिवेशनामध्ये पारित करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनमार्फत केली आहे.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या निर्मितीच्या वेळी 22 टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्याने केलेले आहे. कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्यामुळे निधीअभावी प्लाटफॉर्मला शेड नाही, प्रवाशांना पावसात व उन्हात बसावे लागतेय, पूल, सरकते जिने, पिण्याचे पाणी, स्पीकर, अस्वच्छ बाथरूम व रेल्वेचे दुहेरीकरण अशी अनेक महत्वाची कामे मागील 25 वर्षे रखडलेली असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे.
सध्या कोकण रेल्वेवर 6 हजार कोटींचे कर्ज आहे. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलीनीकरण केल्यास रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर करून ती लवकरात लवकर पूर्ण केली जातील. सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागेल तसेच येथे नवीन रेल्वे गाड्याही वाढवता येतील, याकडे समितीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासंदर्भात गोवा, कर्नाटक व केरळ राज्य सरकार व तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, आपणही या अधिवेशनामध्ये तसा ठराव पारित करून महाराष्ट्र शासनाची 22 टक्के गुंतवणूक ही केंद्र सरकारकडे हस्तांतरित करावी तसेच कोकण रेल्वेचा महाराष्ट्रातील भाग रोहा ते मडूरे हा भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या झोनमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आपण केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी केली आहे.
याचबरोबर आपण मुख्यमंत्री असताना दहा वर्षांपूर्वी सावंतवाडी टर्मिनसचे काम अपूर्ण राहिले असून त्यालाही निधी मंजूर करून ते पूर्ण करावे व या टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली असून, तसा ठराव अधिवेशनामध्ये पारित करावा व केंद्र सरकारचे लक्ष वेधावे, अशी मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार उदय सामंत, आमदार नितेश राणे यांनाही निवेदन देण्यात आली आहेत.